ठाणे - मागील आठ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने उब शोधत असलेल्या सापांनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरात मानवी वस्तीतून चार तर कल्याणच्या रेल्वे लोकोशेडमधून एक असे पाच साप सर्पमित्रांने पकडले आहेत. यानंतर त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून जीवदान देण्यात आले.
नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदलल्याने साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. खडकपाडा परिसरातील नीलकंठ पार्क सोसायटीतील एक रहिवासी दुचाकी काढण्यासाठी पार्किंगमध्ये गेल्यानंतर मोठा साप सोसायटीत शिरल्याची बातमी त्यांनी सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. सर्पमित्र दत्ता यांनी या सापाला पकडून पिशवीत टाकल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा साप धामण जातीचा असून बिनविषारी आहे.
विषारी घोणस साप रेल्वेच्या लोकोशेडमध्ये तर दुसरा पडवीत
दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका घराच्या पडवीत विषारी साप शिरल्याची माहिती वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप पाच फूट लांबीचा असून अंत्यत विषारी घोणस जातीचा आहे. तिसऱ्या घटनेत कल्याण रेल्वे लोकोशेडमध्ये विषारी साप शिरल्याची माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप चार फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अशा घोणस जातीचा आहे.