ठाणे -केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. या कायद्यामुळे दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी समाज एकत्र येऊन लढा देत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे आभार मानतो, असा टोला निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सरकारला लगावला आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात संविधान बचाव समितीच्यावतीने कल्याणामधील शिवाजी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर कोळसे-पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
मागील पन्नास वर्ष दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी, समाजातील नागरिकांना एकत्र करण्यासाठी मी झटत आहे. त्यात मला अपेक्षित यश आले नाही. मात्र, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणून एका झटक्यात हे काम केले. या कायद्यामुळे ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही विरोधात आज दलित, मुस्लीम, ओबीसी एकत्र रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे माझ्या कामाला यश आले, असे बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले.