ठाणे- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कोरोना महामारीच्या विरोधात सज्ज असल्याचा दावा करत आहे. मात्र, कल्याणमध्ये दोन रुग्णांचा उपचाराअभावी रुग्णालयासमोरच तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर आरोग्य विभाग वगळता पोलीस खाते खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी फिजिकल डिस्टन्सिंग, कोरोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भात जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र आरंभले आहे. यामध्ये 792 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या तब्बल 792 नागरिकांसह व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3700 च्या आसपास पोहोचली आहे. महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदींनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी केडीएमसी सज्ज असल्याचा दावा केला आहे. रुग्णांना उपचार मिळण्यात कुठेही कमतरता नाही, असेही सांगितले जात होते. मात्र, कल्याणमध्ये एका रुग्णाला उपचारासाठी बेड न मिळाल्याने तर दुसऱ्या रुग्णाचा वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीत भीतीचे वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 91 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने जाहीर केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रसाराला नागरिकांची गर्दी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी कल्याण-डोंबिवलीतील सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत फौजदारी कारवाईची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कल्याण परिमंडळ - 3 हद्दीत तोंडाला मास्क न लावणारे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, पी-1, पी-2 नियमाचे पालन न करणारे व्यापारी, दुकानदार आणि इतर अशा 792 व्यक्तींच्या विरोधात कारवाई केली. यासर्वांवर भादंवि कलम 188 सह 269, 270 सह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे कलम 51 (ब) अन्वये 792 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 रिक्षांमधून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना आवाहनही केले जात आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये. विनामास्क रस्त्यावर फिरू नये. जमाव करून गप्पा मारू नयेत. दुकानदारांनी दुकानात गर्दी जमवू नये. यासाठी दुकानासमोर योग्य ती मार्किंग करून घ्यावी. आपल्या दुकानसमोर सॅनिटायझर ठेवावे व वेळेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेली फौजदारी कारवाई
1) मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणे : 155
2) दुकानदारांनी दुकानाबाहेर फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणे. त्याचप्रमाणे दुकानात/व्यापाराच्या जागेवर सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था न करणे : 160
3) विनाकारण 5 पेक्षा जास्त जणांनी उभे राहणे, घुटमळणे, गप्पा मारणे किंवा फिरणे : 12
4) भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे : 465