ठाणे - कोरोना चाचणीच्या अहवालाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला (तिकीट तपासनीस) कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे, असे या ठगाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील काटेनवली परिसरात राहणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आशिष याच्या विरोधात यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
जागृत रेल्वे प्रवाशामुळे प्रकार उघड
कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर काल (दि. 25 मे) रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या पत्नीसह लोकलची वाट पाहत होता. इतक्यात त्याच्याजवळ आलेल्या आरोपी आशिषने त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली. त्या तरुणाने रेल्वेचे तिकीट दाखवताच आरोपी आशिषने त्यांच्याकडे आरटीपीसीआर कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची मागणी केली. त्याच्याकडे रिपोर्ट नसल्याचे कळताच आशिषने त्यांच्याकडे 300 रुपयांच्या दंडाची मागणी केली. यामुळे या दाम्पत्याला संशय आला. त्याने त्याला पकडून रेल्वे पोलीसांकडे नेले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा बनावट टीसी असल्याचे निष्पन्न झाले.