ठाणे -भारतीय सैन्य दलात अधिकारी असल्याची बतावणी करून ठगांनी सर्वसामान्य नागरिकांना चुना लावण्याचे सत्र सुरू आहे. डोंबिवलीतील सुसंस्कृत नगरीतील अनेक सुशिक्षितांना या ठगांनी आतापर्यंत तब्बल 8 लाख 35 हजार 467 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या किचकट गुन्ह्याचा तपास सायबर क्राईम ब्रँचने सुरू केला आहे.
मुलांना शाळेत प्रवेश घेण्याच्या बहाण्याने फसवणूक
एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या मनाली महेश गाडगीळ (वय 45 वर्षे) या एका शाळेत मुख्याध्यपिका पदावर नोकरी करतात. मनाली यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 25 जूनला सायंकाळी 5 च्या सुमारास श्रीकांत वर्मा असे स्वतःचे नाव सांगणाऱ्याने मनाली यांच्या गुगल-पेवर संपर्क साधला. भारतीय सैन्य दलात असल्याचे सांगून त्याने आपल्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पैसे हवे असल्याची मागणी केली. खात्री पटण्यासाठी त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशीही बोलायला लावले. त्या दोघांनी मिळून मनाली यांना गुगल-पेवर 11 हजार आणि 9 हजार 999 रुपयांची मागणी केली. मनाली यांना संशय येऊ नये म्हणून त्या ठगांनी बहाणा केला. आर्मी रूल्सप्रमाणे आम्हाला टाइम लिमिट असल्याचे सांगून घाई केली. स्वतः मुख्याध्यापिका असल्याने मनाली यांनी विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये आणि भारतीय सैन्य दलातील जवानांना थेट मदत होईल या हेतूने गुगल-पेद्वारे 74 हजार 999 रुपये पाठविले. मात्र, अशाच पद्धतीने या ठगांनी अन्य काही जणांनाही गंडा घातला. या संदर्भात फसगत झालेल्या सर्वांना एकूण 2 लाख 31 हजार 499 रुपयांचा गंडा घातल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 419, 420 सह भारतीय तंत्र अधिनियम 66 (क), 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.