ठाणे :दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivali Muncipal Corporation) आरोग्य विभागाच्या विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याला ओमायक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
रुग्णाच्या सात नातवाईकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या रुग्णाचे सात नातवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामधील सहा जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर एकाचा रिपोर्ट प्रतीक्षेत आहे. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेवरून केपटाऊन ते दुबई आणि दुबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा विमानाने प्रवास केला.
रुग्णाच्या दिल्ली ते मुंबई प्रवासामुळे चिंतेत भर
या रुग्णाने दिल्लीत कोरोना टेस्ट केली होती. मात्र, मुंबईत आल्यानंतर पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर डोंबिवलीत टेस्ट केली तीही पॉझिटीव्ह आला. विमान आणि नंतर टॅक्सी असा प्रवास केल्याने रुग्ण किती जणांच्या संपर्कात आला आहे यामुळे चिंतेत अधिकच भर पडली आहे.
पालिका प्रशासनाने दिली राज्य शासनाला माहिती
दिल्लीत जर कोरोना टेस्ट केली तर रिपोर्ट येईपर्यंत या रुग्णाला तिथेच कवारंटाइन का केलं नाही,? त्याला पुढील प्रवासाची परवानगी कशी दिली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रवासादरम्यान रुग्णाने प्रवास केलेल्या विमान आणि ओला कारची माहिती पालिका प्रशासनाने राज्य शासनाला दिली आहे. सदर रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सीगसाठी सॅम्पल मुंबईत पाठवले आहेत. आठवडाभरात अहवाल येणार असल्याची माहिती केडीएमसीच्या साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.