कल्याण (ठाणे) - कल्याणमधील बिर्ला इंग्रजी शाळेबाहेर (B.K. Birla Public School) पालकांनी फी वाढीविरोधात (school fee hike) काळ्या फिती बांधून आंदोलन केले. बिर्ला शाळा प्रशासनाने यंदाच्या वर्षी 20 टक्के वाढ केली आहे. ही फी वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप पालकांनी करत शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन करत शाळा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शाळेने फी वाढ मागे घ्यावी, अशी मागणीही केली.
पालकवर्ग शिक्षण मंत्र्यांसह न्यायालयात धाव घेणार
या आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या पालकांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत शाळा प्रशासनाने ही वाढ मागे घेण्यास नकार दिल्याची माहिती पालकांनी दिली. त्यामुळे यापुढेही शाळे विरोधात आंदोलन करणार असल्याची आपली भूमिका पालकांनी स्पष्ट केली. शाळेच्या या निर्णया विरोधात शिक्षण मंत्र्यांसह न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पालकांनी दिला.