KDMC Election 2022 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक; १३३ प्रभाग रचनेवर हरकतीचा पाऊस - कल्याण डोंबिवली महानगरपालिका
यंदाची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून ४४ प्रभाग असणार आहेत. त्यापैकी ४३ प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण १३३ सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत.
ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC Election 2022) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. यंदाच्या निवडणुकीत १३३ प्रभागाच्या सीमा प्रसिद्धीकरून हरकती व सूचना १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यतच्या कालावधीत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज हरकती व सूचनांचा शेवटाच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी १३३ प्रभाग रचनेबाबत ९९७ हरकती अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक उपआयुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे.
हरकतींवर १८ फेब्रुवारी पासून सुनावणी
या हरकतींवरील सुनावणी सचिव अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई तथा प्राधिकृत अधिकारी विजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर महापालिका स्थायी समिती सभागृहात येत्या १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरु होणार असल्याचीही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. १ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिका निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी दोन आठवड्याचा देण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम २६ फेब्रुवारीपर्यंत असून सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगास २ मार्च रोजी पाठविले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
असे असेल पॅनल पद्धतीने प्रभागांचे आरक्षण
यंदाची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून ४४ प्रभाग असणार आहेत. त्यापैकी ४३ प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण १३३ सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत. त्यापैकी ६७ जागा महिलांसाठी आहेत. तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी १३ जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी ७ राखीव आहेत. तसेच अनुसूचित जमाती साठी ४ जागा असून त्यापैकी २ जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा ११६ असून त्यापैकी ५८ जागा महिलांसाठी राहणार आहेत.
हेही वाचा -Leopards Calf Head Stuck In Jar : बिबट्याच्या बछडयाला लागली तहान.. अन् डोकं अडकून बसला पाण्याच्या जारमध्ये