ठाणे- झारखंडमधील एका चिमुकलीच्या बलात्कारप्रकरणी फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून वीस मिनिटात अटक केली. यानंतर संबंधित आरोपीला दुमका सत्र न्यायालयाने चोवीस दिवसात फाशीची शिक्षा सुनावली. तत्परतेमुळे हे शक्य झाल्याने उपायुक्त पानसरे यांनी गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले.
मृतदेह गाडून मुंबईला फरार होण्याचा रचला कट
झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षाच्या चिमुकालीवर तिच्या एका नातेवाईकाने मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला. यानंतर चिमुकलीची हत्या करून मृतदेह पुरण्यात आला. संबंधित मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
झारखंडमधील एका चिमुकलीच्या बलात्कारप्रकरणी फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून वीस मिनीटांत अटक केली. संबंधित कामगिरीबद्दल कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
फक्त 20 मिनिटात ठोकल्या बेड्या
या प्रकरणाचा मुख्य आरोपी मिठू राय फरार झाला होता. तो मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती दुमका पोलिसांना मिळाली. यानंतर दुमकाचे पोलीस अधीक्षक रमेश यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधत आरोपी प्रवास करत असलेल्या ट्रेनची महिती पुरवली. संबंधित ट्रेन वीस मिनिटांत कल्याण रेल्वे स्थानकात पोहचणार असल्याचे कळवले.
कल्याण पोलिसांकडे फक्त २० मिनिटांचा कालावधी असल्याने तत्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक कल्याण स्थानकात दाखल झाले. झारखंड पोलिसांकडून मिळालेल्या फोटोंच्या आधारे नराधमाला अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत बेड्या ठोकल्या आणि झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे अन्य साथीदार पंकज मोहाली आणि अशोक राय या दोघांची संपूर्ण माहिती दुमका पोलिसांना देण्यात आली.
दुमका सत्र न्यायालयाचा 24 दिवसात निकाल
संबंधित घटनेच्या चोवीसाव्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दुमका सत्र न्यायालयाने या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणच्या पोलिसांमुळे हे शक्य झाले असून या गुन्ह्यात आरोपीला पकडून त्याच्या साथीदारांचा छडा लावणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सुरेश डांबरे, दीपक सरोदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सत्कार करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.