कल्याण डोंबिवली(ठाणे)- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊनबाबत केडीएमसी प्रशासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानूसार आता संपूर्ण क्षेत्राऐवजी केवळ कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन कायम असणार आहे. त्यानुसार केडीएमसी क्षेत्रातील तब्बल 48 ठिकाणे ही कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. ही क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणी नियम आणि अटींसह दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊन संपण्यास अवघा अर्धा तास शिल्लक असताना केडीएमसीकडून पुन्हा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 2 जुलै ते 12 आणि 12 ते 19 जुलैपर्यंत असा 17 दिवसांचा लॉकडाऊन केडीएमसी क्षेत्रात घेण्यात आला. मात्र, लॉकडाऊन काळातही कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी घट झालेली दिसून आली नाही.
रविवार लॉकडाऊनचा अखेरचा दिवस असल्याने केडीएमसी प्रशासन हा लॉकडाऊन अजून वाढवते की, त्यात काही बदल करून नवीन नियम जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानूसार हा लॉकडाऊन संपायच्या अवघ्या काही मिनिटे आधी केडीएमसीने आपली लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर केली आहे.
दरम्यान, केडीएमसी क्षेत्रात कोरोनाचे एकूण 48 हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले असून याठिकाणी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
नवीन नियम
• केडीएमसीने जाहीर केलेल्या हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार लॉकडाऊन…
• हॉटस्पॉट क्षेत्र वगळता संपूर्ण शहरात मिशन बिगीन अगेनप्रमाणे कार्यवाही…
• मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स राहणार बंद…
• सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी1- पी2 नूसार चालवण्यास परवानगी…
• सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने…
• प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस ठरवणार पी1 – पी2…
• हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहणार….