ठाणे - आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एचपी गॅस टँकरचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यानंतर महामार्गावरील डिव्हायडर तोडून टँकर थेट आटगावजवळील रेल्वे ट्रॅकवर जाऊन धडकला. हा अपघात आज(5 जुलै) 7 वाजून 30 मिनिटांनी घडला.
अटगावजवळ रेल्वे ट्रॅकवर घुसला गॅस टँकर दरम्यान, टँकर रेल्वे मार्गात घुसल्याने संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची कसाराकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन आसनगाव, वाशिंद, खडवली स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. संध्याकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. दोन तासानंतर सदर टँकर क्रेनच्या सहाय्याने काढण्याता आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी रेल्वे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम, स्थानिक ग्रामस्थ, रेल्वे अधिकारी दाखल झाले आहेत.