ठाणे - रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला टाकणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून एका श्वानप्रेमीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी उकळली. आठवड्याभरात उरलेली रक्कम न दिल्यास कोर्टात खेचीन आणि मीडियाद्वारे बदनामी करीन, अशी धमकी श्वानप्रेमीने दिली. त्याच्याविरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंदवून 24 तास उलटूनही हा खंडणीबहाद्दर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. चेतन शर्मा असे कथित श्वानप्रेमी खंडणीबहाद्दरचे नाव आहे.
डोंबिवली पश्चिमेला राहणारे फिलीप मॅथ्यू हे डॉन बॉस्को हायस्कूलचे मुख्यध्यापक असून ते वास्तव्यास असलेल्या रेतीबंदर रस्त्यावरील श्री प्रेमनगर सोसायटीचे देखील चेअरमन आहेत. या सोसायटीच्या तळमजल्यावरील फ्लट नं. 3 मध्ये राहणाऱ्या रजनी रेवणकर (वय - 63) या भटक्या कुत्र्यांना दररोज खायला घालत असतात. त्यामुळे सोसायटीमध्ये कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटके कुत्रे सोसायटीतील इतर लोकांवर जोर-जोराने भुंकतात, अंगावर धावतात. रहिवाश्यांच्या दुचाकीचे सीट कव्हर फाडतात. त्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. पदाधिकारी व सदस्यांनी सोसायटीच्या वेळोवेळी आयोजित केलेल्या मिटींगमध्ये हा मुद्दा उपस्थित करून रजनी रेवणकर यांना समज दिली. परंतु त्या भटक्या कुत्र्यांना खायला घालणे बंद करत नाहीत. यामुळे रहिवासी खूप त्रस्त झाले आहेत. सोसायटीचे चेअरमन फिलीप मॅथ्यू यांच्याकडे सर्व रहिवासी वारंवार तक्रारी करत असतात. शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रजनी रेवणकर यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुत्र्यांना सोसायटी आवारामध्ये किंवा सोसायटीच्या आसपास खायला घालणे बंद करा. कुठेतरी दूर खाडीकिनारी वगैरे मोकळ्या जागेत कुत्र्यांना खायला द्या, अशी समजूत घातली.