ठाणे -डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील शिवाजी पुतळ्या लगतची मध्यवर्ती शिवसेना शाखेचा कब्जा ( Shiv Sena branch dispute Issue ) कोणाकडे यावरुन गेल्या महिन्यापासून धुसफूस सुरू होती. या शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो ठाकरे गटाकडून ( Shiv Sena vs Shinde Group ) बंडखोरी नंतर हटविण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील शिवसैनिकांनी मंगळवारी दुपारी अचानक मध्यवर्ती शाखेत घुसून तेथील ठाकरे गटातील पुरुष, महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करत बाहेर काढले. कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार शिंदे यांचे फोटो लावले.
बळजबरीने शाखेत घुसून मारहाण :ठाकरे गटाने शिंदे गटातील शिवसैनिकांना शाखे बाहेर थोपविण्याचे प्रयत्न केले. परंतु एकावेळी शिंदे गटातील दोनशे ते अडीशे जणांनी बळजबरीने शाखेत घुसून शाखेतील ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना शाखे बाहेर जाण्यास सांगताच, त्याला ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर यांनी विरोध केला. राडा करण्याच्या इराद्याने शाखेत घुसलेल्या शिवसैनिकांनी खामकर यांना मारहाण करत शाखेच्या बाहेर नेले. त्यांचा शर्ट फाडला. खामकर यांच्या बचावासाठी धावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांवर हात उचलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटातील शिवसैनिकांनी केला. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले.
पोलिसांनी शाखा परिसरातील बंदोबस्त वाढविला :डोंबिवली पश्चिमेतील कोपर, कल्याण पूर्वेतील शिंदे समर्थक शिवसैनिक मोठ्या संख्येने शाखे समोर जमल्याचे चित्र होते. शाखेत कल्याण जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ, विधानसभा संघटक कविता गावंड इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दोन्ही गटात तुफान राडा होऊ शकतो याचा अंदाज घेऊन पोलिसांनी शाखा परिसरातील बंदोबस्त वाढविला आहे.