ठाणे - उल्हासनगरमध्ये गर्दुल्यांच्या त्रिकुटाने घरात घुसून महिलेसह वडील व भावाला चाकूचा धाक दाखवत घातक द्रव्य असलेल्या स्प्रेने हल्ला केला. या स्प्रे हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ३ परिसरातील रेणुका सोसायटीत घडली.
धक्कादायक ! घरात घुसून गर्दुल्यांचा महिलेवर हल्ला हसीना समीर शेख (वय ३२) असे गंभीर महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुर्दुल्यांच्या त्रिकुटावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारुख, किसन, साजिद असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर गुर्दुल्यांची नावे असून हे तिघेही फरार आहेत.
धक्कादायक ! गर्दुल्यांचा महिलेवर हल्ला. किरकोळ वादातून ‘स्प्रे’ हल्ला करून गर्दुल्ले फरार पीडित हसीना तिच्या कुटुंबासह उल्हासनगर मधील ३ नंबर परिसरात असलेल्या रेणुका सोसायटीत राहते. काल दुपारच्या सुमारास आरोपी गुर्दुल्यांच्या त्रिकुटाकडे ती बघत होती. त्यामुळे या आरोपी गुर्दुल्यांनी तिला शिवीगाळ करत वाद घातला. त्यामुळे पीडित महिलेने जाब विचारला असता त्याच रागातून या हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवला आणि ते घरात घुसले. यानंतर संबंधित महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. बहिणीला मारहाण होताना पाहताच भाऊ व वडील देखील वाचविण्यासाठी आले. मात्र या गुर्दुल्यांनी तिघांवरही घातक द्रव्य असलेल्या स्प्रेने हल्ला केला. या हल्ल्यामुळे हसीनाला चक्कर येऊन तिची शुद्ध हरपली होती. त्यामुळे नातेवाईकांनी तिला उल्हासनगर मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केदार करत आहेत.
काही दिवसांपूर्वीही स्कायवॉकवर गर्दुल्यांकडून तरुणीची छेड
कल्याण पूर्व पश्चमेला जोडणारा स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य बनला आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका तरुणीचा गर्दुल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरडा केल्याने जमा झालेल्या नागरिकांनी या गर्दुल्ल्याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार समोर आला होता.