महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्पेशल रिपोर्ट : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांवर; बेड मात्र निम्म्यावर

महापालिका रुग्णालय आणि खासगी कोविड रुग्णालयांतील बेडची क्षमता पाहता ३ हजार ३२० च्या जवळपास आहे. त्यामुळे निम्म्यावरच रुग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. इतर रुग्णांना मात्र अनेक रुग्णालयांचे उंबरे झिजवावे लागत आहे. तर अनेकांना मुंबई आणि ठाणे शहरात उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. या सर्व धावपळीत अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहे.

corona
कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांवर

By

Published : Jul 28, 2020, 4:18 PM IST

Updated : Jul 28, 2020, 6:21 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा १६ हजारांच्या पलीकडे गेला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने दूरदृष्टी ठेवत आरोग्य यंत्रणेचे नियोजन करणे आदीच गरजेचे होते. मात्र, आता शहरांमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. महापालिका हद्दीत आजपर्यत १६ हजार ६०२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५ हजार ९१० कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मात्र अनेक कोरोनाबाधित रुग्णांना 'बेड'ची कमतरता भासत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांवर...

विशेष म्हणजे, महापालिका रुग्णालय आणि खासगी कोविडं रुग्णालयांतील बेडची क्षमता पाहता ३ हजार ३२० च्या जवळपास आहे. त्यामुळे निम्म्यावरच रुग्णांना बेड उपलब्ध होत आहे. इतर रुग्णांना मात्र अनेक रुग्णालयांचे उंबरे झिजवावे लागत आहे. तर अनेकांना मुंबई आणि ठाणे शहरात उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. या सर्व धावपळीत अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहे. पाहा यासंदर्भातील 'ई टीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...

हेही वाचा -राज्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त, ८ हजार ७०६ कोरोनामुक्त

डोंबिवलीतील पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय हे सर्वाधिक कोविड रुग्ण असलेले रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. तर, कल्याणमधील हॉलीक्रॉस, डोंबिवलीतील आरआर बाज, कल्याण ग्रामीणमधील न्युऑन यासह २० खासगी कोविड रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेतली आहेत. एकीकडे कोरोनामुक्त होऊन रुग्ण घरी परतत असले, तरी नवीन कोरोनाबाधितांची संख्या तिप्पटीने वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका विविध आजारांसह मधुमेहाच्या रुग्णांना बसत असून, बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. तर, बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ होत असून, नागरिक समाजसेवकांकडे बेडसाठी विनंती करताना दिसत आहेत.

पालिकेचे डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय कायमच वादग्रस्त चर्चेत असल्याने नागरिक आपसूकच खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र, या ठिकाणी बेड उपलब्ध होत नसल्याने ठाणे, मुंबई शहरात नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. तर आधी रिपोर्ट द्या त्यानंतरच उपचारासाठी या, असा फतवा खासगी रुग्णालयांनी काढल्यामुळे कल्याणमध्ये दोन रुग्णांना कोरोना चाचणीच्या प्रतीक्षेत उपचाराविना प्राण गमवावा लागल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा -शिवसेनेने राम मंदिरासाठी काहीही न करता केवळ पोकळ दावे केले; चंद्रकांत पाटलांची टीका..

सद्यपरिस्थिती पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर रुग्णालयासह महापालिका प्रशासनाने आजमितीच २० खासगी कोविड रुग्णालयांशी करारनामा करून, रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केले आहे. मात्र, महापालिका आणि खासगी कोविड रुग्णालयातील आयसीयू बेडसह अन्य बेड धरून केवळ ३ हजार ३२० कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या २० दिवसाच्या या कालावधीत दिवसाला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर आहे. तर मंगळवारपर्यत ५ हजार ९१० रुग्णांवर कल्याण - डोंबिवली, भिवंडीतील टाटा आमंत्रा, ठाणे, नवीमुंबई, मुंबई, उल्हासनगर अशा विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

महापालिका आरोग्य विभागाची यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर

महापालिका आरोग्य विभागात आतापर्यत १७० च्या जवळपास कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरापासून आरोग्य वैद्यकीय विभागात नव्याने कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, नर्स, या पदासाठी भरती करण्यात आली. मात्र, आजपर्यत केवळ १२ डॉक्टर आणि १७० वार्डबॉय कामावर रुजू झाल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. कदम यांनी दिली असून, डॉक्टरांना २ लाखांपर्यत वेतन देऊनही डॉक्टर मिळत नसल्याचेही त्यांनी सांगत आरोग्य विभागातील बहुतांश कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्याचा ताण सद्या स्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महापालिका आरोग्य विभागाची यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याची भीती मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश कदम यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा -दिलासादायक..! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, दर 57 टक्क्यांवर

सर्वसामान्य रुग्णांना टाटा आमंत्रा विलगीकरणाचा आधार

जिल्ह्यातील तीन महापालिका आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासह विलगीकरणाची सुविधा कल्याण भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रा येथे करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी आतापर्यत सुमारे ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कदायक वास्तव समोर आले आहे. याठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांसाठी २ हजार ४०० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या येथे २ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे चाळ, झोपडपट्टी भागातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. या ठिकाणी सुरवातीला रुग्णांना असुविधांसह जेवणाची परवड होत होती. मात्र, गेल्याच आठवड्यात येथील जेवण पुरवणारा ठेकेदार बदली केल्याने सध्याच्या स्थितीत जेवणाची सुविधा जरी मिळत असली तरी मात्र २३ मजल्याच्या या इमारतीमध्ये औषध गोळ्या घेण्यासाठी रुग्णांना ५ व्या मजल्यावर यावे लागत असल्याचे एका रुग्णाने सांगितले. तर, विलगीकरणात आतापर्यत ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नव्याने २ हजार बेडचे रुग्णालयासह विलगीकरणाचा प्रस्तााव मंजूर

रुग्णांची संख्या पाहता बेड अपुरे पडत असल्याने येणाऱ्या आठ दिवसात किमान नव्याने २ हजार बेडच्या रुग्णालयासह विलगीकरणासाठी विविध ठिकाणच्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी कामे सुरु असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले. तर कल्याण डोंबिवलीत बेड्स उपलब्ध नसल्याच्या रोज १० ते १२ तक्रारी येत आहेत. या रुग्णांना ठाणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी बेडस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काही समाजसेवक करत आहेत. आजही रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत असल्याने रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या शोधातच असल्याने काही रुग्ण प्राण सोडतील. अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते. ऍड उदय रसाळ यांनी दिली आहे.

दरपत्रकाचे पालन करावे

कोविड रुग्णालये म्हणून जाहीर करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांनी केडीएमसीने ठरवून दिलेले दरपत्रक रुग्णालयात ठिकठिकाणी प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. काही रुग्णालये दरपत्रकाचे पालन करत नसून अवाजवी बिल लादत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेले दरपत्रक रुग्णालयात लावणे बंधनकारक करून खासगी रुग्णालयांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन रुग्णालयांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पालिकेच्या वेबसाईटवरही ही माहिती उपलब्ध होणार आहे. अजून काही रुग्णालयांमध्येही कोरोनाग्रस्तांना उपचार देण्यात येतील. दरपत्रकाबाबत पाहणी केली जाईल. या अगोदरही दरपत्रक लावण्याबाबत रुग्णालयांना नोटीस काढण्यात आल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी, डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.

Last Updated : Jul 28, 2020, 6:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details