महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळला; टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीमुळे टळली जीवितहानी - इमारतीचा भाग कोसळला

भिवंडीतील जिलानी इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आज डोंबिवलीत एका धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळला; सुदैवाने एका टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीमुळे जीवितहानी टळली आहे.

building collapse in thane
इमारतीचा अर्धा भाग कोसळला

By

Published : Oct 29, 2020, 12:35 PM IST

ठाणे- कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातच आज पहाटेच्या सुमारास डोंबिवलीच्या कोपर रोड भागात एका 2 मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळला आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत असणाऱ्या एका व्यक्तीमुळे इमारतीतील लोकांचा अगदी थोडक्यात जीव बचावला आणि मोठी दुर्घटना टळली आहे.

पहाटेपर्यंत टीव्ही पाहणाऱ्याच्या सतर्कतेने टळला धोका-

कोपर परिसरात मुख्य रस्त्याला लागून ही दुर्घटनाग्रस्त इमारत ४२ वर्षे जुनी आहे. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण 15 रहिवाशी राहत होते. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. त्यावेळी इमारतीमधील एक व्यक्ती पहाटेपर्यंत टीव्ही पाहात होता. इमारतीचा काही भाग कोसळल्याचा आवाज त्याने ऐकला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा करून सर्व रहिवाश्यांना सतर्क केले.

इमारतीचा अर्धा भाग कोसळला

रात्री पासूनच पडत होती माती -

इमारतीचा काही भाग कोसळला आहे, हे लक्षात येताच इमारतीमधील सर्व रहिवाश्यांनी तत्काळ इमारती बाहेर धाव घेतली. त्यानंतर इमारतीचा जवळपास अर्धा भाग कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. तर रात्रीपासूनच या इमारतीमध्ये माती कोसळण्यास सुरुवात झाली होती. परंतू या रहिवाशांनी महापालिकेला कळवले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी कर्मचारी याठिकाणी दाखल झाले असून इमारतीचा उर्वरित भागही पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

भिवंडीतही कोसळली होती इमारत-
गेल्याच महिन्यातभिवंडीतील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 41 जणांचा बळी गेला होता. तर 25 जखमींना बाहेर काढण्यात यश मिळाले होते. भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. महापालिका क्षेत्रातील २८४ धोकादायक आणि १८७ अतिधोकादायक इमारतींची यादी नुकतीच जाहीर केली होती. तसेच इमारत पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details