औरंगाबाद - संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका हॉटेल चालक तरुणाने आपल्या हौसेखातर पावणे दोन लाख रुपयांची सोन्याची चप्पल तयार करून घेतली आहे. संदीप राठोड, असे या तरुणाचे नाव आहे.
हौसेला मोल नाही, औरंगाबादचा 'हा' तरुण घालतो चक्क सोन्याची चप्पल - सोने
सोन्याच्या आकर्षणातून संदीपने सोन्याची चप्पल बनवून घेतली आहे. विशेष म्हणजे ही चप्पल शोभेची वस्तू नसून या चप्पलीचा दररोज वापर केला जातो.
भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण नुकताच पार पडला. या दिवशी सोने खरेदीचा नवा उच्चांक गाठला गेला. सोने म्हटले, की पुरुष आणि स्त्रीया या दोघांनाही त्याचे आकर्षण असते. याच आकर्षणातून संदीपने सोन्याची चप्पल बनवून घेतली आहे. विशेष म्हणजे ही चप्पल शोभेची वस्तू नसून या चप्पलीचा दररोज वापर केला जातो. संदीपला बऱ्याच दिवसांपासून सोन्याची चप्पल तयार करायची इच्छा होती. मात्र, आर्थिक अडचणीमुळे तो आतापर्यंत सोन्याची चप्पल बनवू शकला नव्हता. आता त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्याने आपली जुनी इच्छा पूर्ण केली. त्याने प्रकाश ज्वेलरी शॉपचे मालक सचिन देवगिरीकर यांच्याकडून ही चप्पल बनवून घेतली. यासाठी त्यांना पावले दोन लाख रुपये खर्च आला आहे. यात अजूनही कलाकुसर बाकी असून चप्पलेला आकर्षक बनवण्यासाठी त्यात अधिक सोने टाकणार असल्याची माहिती संदीपने दिली.
संदीप जेव्हा ही सोन्याची चप्पल घालून बाजारात जातो. त्यावेळी त्याच्या भोवती चप्पल बघण्यासाठी लोकांची झुंबड उडते. त्याच्या मित्रांशी चर्चा केली असता संदीपला लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची सवय आहे, असे त्याने सांगितले.