औरंगाबाद - 15 दिवसापूर्वीच विवाह झालेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी येथील गोगाबाबा टेकडी येथे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. शाफिक रफिक पठाण (वय-28, रा.जयसिंगपुरा, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गोगाबाबा टेकडीवर तरुणाची गळा आवळू हत्या शाफिक हॉटेल मध्ये कामगार होता, रात्री घरच्यांसोबत जेवण केल्यानंतर मी बाहेरून जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. रात्री बराच वेळ झाल्यानंतरही तो घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो कोठेही मिळून आला नाही.
सकाळी गोगाबाबा टेकडी येथे मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या नागरिकांना एक तरुण डोंगराच्या पायथ्याशी पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता. नागरिकांनी त्यास हलवून पाहिले असता, कोणतेही प्रत्युत्तर मिळत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानतंर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शाफिकची ओळख पटवली आणि त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले. शाफिकच्या गळ्याभोवती जखमा आढळून आल्या आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
15 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न -
मृत शफिक च्या पहिल्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. त्याला पहिल्या पत्नीपासून एक आपत्य आहे. 15 दिवसा पूर्वीच त्याचे दुसरे लग्न झाले होते. तेंव्हा पासून तो खूप आनंदी होता. अशी माहिती मिळाली आहे.