औरंगाबाद -चाळीस दिवसांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन कंपनीने एका महिलेची १ लाख ५६ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. महिलेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर याप्रकरणी तपास करुन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या हॉटेलमध्ये सेमीनार घेतलेल्या कंपनीचे अधिकाऱ्यांचे काही महिन्यातच मोबाईल बंद झाले.
तेजस्वीनी सुधाकर गायकवाड (३८, रा. समर्थनगर) यांनी २०१७ मध्ये एस.एम.सी. ग्लोबल या कंपनीत डी.मॅट अकाऊंट उघडले. त्यानंतर शेअर ब्रोकर विश्वास बोबडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये बोबडे याने त्यांना युटूव्ही ऑनलाईन प्रा. लि. या कंपनी विषयी माहिती दिली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीवर दामदुप्पट परतावा मिळतो, असे सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी मार्च २०१८ मध्ये कंपनीत ६ हजार ३०० रुपयांचे दोन आयडी (गुंतवणूकीचे फॉर्म) घेतले होते. कंपनीची वेबसाईटवर लॉगीनमध्ये त्याची स्थिती दर्शवली जात होती. त्यानुसार गायकवाड यांनी प्रती ८ हजार रुपयांचा एक आयडी असे २० आयडी विकत घेतले. त्यानंतर पहिल्या आठवड्यात त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर १६ हजार रुपये २ आठवड्यात जमा झाले. मात्र, त्यानंतर त्यांना कुठलाही परतावा आला नाही. त्यांनी अनेकदा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.