औरंगाबाद -गजानन महाराज मंदीरासमोर आसाराम बापुंचे साहित्य विक्री करणार्या तरुणाने ग्राहक असलेल्या तरुणीचा नंबर मिळवत लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने कॉलगर्ल नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करुन तरुणीची बदनामी ( Women Fake Account On facebook ) केली. याप्रकरणी सायबर पोलिसांना आलेल्या तक्रारीवरुन मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आसाराम बापुंच्या गुरुकुल येथे काम करणाऱ्या आचाऱ्याला पोलिसांनी अटक केली ( Cyber Police Arrested Cook ) आहे.
गोविंद राजेंद्र नाईक (३६, मुळ रा. ओरीसा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद हा गजानन महाराज मंदिराजवळ आसाराम बापुंच्या साहित्याची विक्री करतो. यावेळी ग्राहक असलेल्या २६ वर्षीय तरुणीशी त्याची ओळख झाली. गोविंद याने तरुणीला लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, मुलीने लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला. २० ऑगस्ट २०२१ रोजी गोविंद नाईक याने पीडित महिलेचा मोबाईल क्रमांक हा बनावट फेसबुक प्रोफाईलवर अपलोड केला.
त्या फेसबुक प्रोफाईलवर त्याने पिडीत महिलेस कॉलगर्ल म्हणुन कॉल व मॅसेज करावे, अशा आशयाची माहिती शेअर केली. त्याचा फायदा घेवून अनेकांनी पीडित महिलेसोबत अश्लील चॅटींग केली. या प्रकारामुळे महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेर तिने सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुरुकुल मध्ये होता आचारी -दरम्यान, सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. तेव्हा आरोपी हा मुळ ओडिसा राज्यातील असून तो अल्पशिक्षित असल्याचे समोर आले. तसेच, सध्या तो मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आसाराम बापु आश्रमच्या गुरुकुलमध्ये अन्न बनवण्याचे काम करत आहे. त्यावरून सायबर पथकाने छिंदवाडा येथे जाऊन आरोपी गोंविद नाईक याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला औरंगाबादला आणत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उप-आयुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, जमादार संजय साबळे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, रवि पोळ, वैभव वाघचौरे, सानप, जयश्री फुके, सुनिता चेके, संगिता दुबे, सोनाली वडनेरे, कांबळे यांनी केली.
...तर सायबर पोलिसांशी संपर्क साधावा - तरुणींनी किंवा महिलांनी अनोळखी व्यक्तींना शक्यतो मोबाईल क्रमांक देऊ नये. कोणाला आनोळखी व्यक्तींकडुन त्रास होत असेल. अथवा बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मिडियावर बनावट अकाउंट तयार करत असेल, तर तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.
हेही वाचा -Mahavikas Aghadi Reshuffle : महाविकास आघाडी सरकारमध्ये फेरबदल होण्याची शक्यता; लवकरच नेत्यांची बैठक