महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ- अजित पवार - शिवस्वराज्य यात्रा औरंगाबाद

औरंगाबाद येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने झालेल्या सभेत अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करताना सरकार बनवाबनवी करत आहे. शिवसेना मोर्चे काढते, सरकार तुमचं आहे तर मग पैसे दे असं म्हणायला पाहिजे. ही फसवेगिरी आहे. असंही ते यावेळी म्हणाले. पन्नास वर्षे राज्य करून जेवढं कर्ज काढलं तेवढं या सरकारने पाच वर्षातच काढून टाकलं तरी राज्यात कामं का होत नाहीत ?असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अजित पवार

By

Published : Aug 19, 2019, 8:46 PM IST

औरंगाबाद- देशात नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली, काही हरकत नाही. मात्र राज्याचे प्रश्न वेगळे असतात. आम्हाला निवडून आणा. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि तरुणांना रोजगार देऊ असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने झालेल्या सभेत दिले.

औरंगाबाद येथे शिवस्वराज्य यात्रेतील सभेत बोलताना अजित पवार

आमचे नेते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभे आहेत. आम्ही अनेक कुटुंब उभे राहतील अशी मदत करणार आहोत. आज मदतीची गरज आहे आणि मंत्री सेल्फी काढण्यात दंग आहेत. कसली मस्ती डोक्यात गेली कळत नाही. अशी टीका अजित पवार यांनी जाहीर सभेत केली. यात्रा परिवर्तनासाठी असली तरी परिवर्तन लवकर होत नसते. आमची पंधरावर्षांची कारकिर्द आणि या सरकारची पाच वर्षांची कारकिर्द बघा समजून जाईल. राज्यात आमचं सरकार आलं तर एखादा कारखाना आणून 75 टक्के स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे असा कायदा करू. असंही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जे माफ करताना सरकार बनवाबनवी करत आहे. शेतकऱ्याला मदत देताना दीड लाखाच्या वरची रक्कम आधी भरा, मग दीड लाख मिळतील असं ते म्हणतात. मात्र ते पैसे असते तर शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफीसाठी आला तरी असता का? असा टोला त्यांनी भाषणात लगावला. शिवसेना मोर्चे काढते, सरकार तुमचं आहे ना मग पैसे दे असं म्हणायला पाहिजे. ही फसवेगिरी आहे, तुम्ही फसू नका. तुम्ही आमचं सरकार आणा आम्ही सरसकट कर्ज माफी देऊन टाकू. अनेक उद्योग अडचणीत आहेत. विमान कंपन्या अडचणीत आल्या. इतर कंपन्या तोट्यात आहेत. व्हिडिओकॉन कंपनी बंद पडली. कॅफे कॉफी डेच्या मालकाने आत्महत्या केली. कर भरूनही हाल झाले म्हणून त्याने आत्महत्या केली. रेल्वे तोट्यात गेली आहे. वाहन उद्योगात मंदी आली. आमचे सरकार आले तर ज्या जागा रिक्त आहेत त्या सर्व जागा भरू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.


आम्ही पन्नास वर्षे राज्य करून अडीचलाख कोटी कर्ज काढलं. या सरकारने पाच वर्षातच तेवढं कर्ज काढलं. मग राज्यात कामं का होत नाहीत, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details