औरंगाबाद -दहावीचा निकाल लागून 20 दिवस झाले असले तरी अद्याप अकरावीच्या प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. त्यात सीईटीबाबत शासनाचे धोरण अस्पष्ट असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन निकाल लावून फायदा काय? असा प्रश्न शिक्षक आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
सीईटी बाबत संभ्रम -
16 जुलै रोजी दहावीचा निकाल लावण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने निकाल लावत असताना अनेक त्रुटी त्यावेळी दिसून आल्या. मात्र, आधीच दीड वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने लागलेल्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, अकरावीत प्रवेश घेत असताना सीईटी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, असे असले तरी सर्व विद्यार्थ्यांना सीईटी बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत विद्यार्थी विचारणा करत असल्याची माहिती वंदे मातरम शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक सुरवसे यांनी दिली आहे.