महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये सायकल खरेदीसाठी 8 दिवसांची प्रतीक्षा यादी, कोरोनाचा प्रभाव - demand of cycling

कोरोना विषाणूच्या महामारीने जनतेचे राहणीमानच बदलून गेले आहे. प्रत्येकाला आरोग्याचे महत्व समजले आहे. कोरोना काळात सुरू झालेल्या लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येकजण आता आपले आरोग्य निरोगी आणि सुदृढ कसे राहिल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी नागरिकांचा सायकल चालविण्याकडे कल वाढला आहे. परिणामी बाजारात सायकलची मागणी वाढली आहे. मात्र, आवश्यक तेवढा पुरवठा नसल्याने ग्राहकांना सायकलसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

सायकल खरेदीसाठी प्रतीक्षा यादी
सायकल खरेदीसाठी प्रतीक्षा यादी

By

Published : Nov 22, 2020, 6:21 PM IST

औरंगाबाद - सायकल खरेदी करण्यासाठी आता आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोव्हिडचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य चांगले राहावे याकरिता सायकल चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याेच दिसून येत आहे. त्यासाठी सायकल खरेदीदारांची संख्याही वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्याने पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सायकलसाठी ग्राहकांना आता प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती सायकल विक्रेत्यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सायकल विक्री बाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

सायकल खरेदीसाठी प्रतीक्षा यादी
सायकल विक्रीत चार पटीने वाढ-

औरंगाबाद शहरात सायकलची विक्री चार पटीने वाढली आहे. विशेषतः इंपोर्टेड सायकल, गियरच्या सायकलची मागणी वाढली आहे. लॉकडाऊन आधी महिन्याकाठी पाच ते सहा हजार सायकलची विक्री होत असे, मात्र कोरोनाच संकट निर्माण झाल्याने शाररिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात सायकल चालवून आरोग्य चांगले ठेवण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याने महिन्याकाठी सायकल विक्री जवळपास 25 हजारांच्या घरात गेली आहे. परिणामी आवक कमी आणि विक्री अधिक झाली, त्यामुळे सायकल खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

जुन्या सायकलची देखील देखभाल दुरुस्ती-

वाढत चाललेल्या यंत्रांच्या वापरात आरामदायी जीवन जगण्याची सवय वाढत चालली आहे. परिणामी मोटारसायकल आणि चार वापराचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे घरात असलेल्या सायकली अडगळीची शोभा वाढवत होत्या. मात्र कोरोनामुळे व्यायाम करण्याची आवश्यकता वाटायला लागली. मग काय जुन्या सायकली दुरुस्ती करण्याकडे अनेकांनी भर दिला. पूर्वी पाच ते सहा सायकल दुरुस्त करणारे कारागीर आता वीस ते तीस सायकली दुरुस्त करू लागले. त्यामुळे सायकल पुन्हा एकदा चांगले दिवस आले असे म्हणावे लागत आहे.

जनजागृतीचा परिणाम झाला-

कोरोनाचे संकट देशावर आल्यावर आजार होऊच नये, यासाठी शाररिक क्षमता म्हणूनच रोग प्रतिकार शक्ती चांगली असावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे अनलॉक झाल्यावर आपले शरीर सुदृढ कसे ठेवता येईल याबाबत वेगवेगळ्या स्वरूपाचे जनजागृती अभियान राबवले जात आहेत. त्यात सायकल प्रेमींनी सायकल चालवणे आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, याबाबतचा प्रसार केला. त्यामुळे सायकलचे महत्व पटलेल्या अनेकांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली. परिणामी सायकल चालवणाऱ्यांच्या संख्येत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सायकलच्या किंमतीत होणार 10 ते 15 टक्क्यांनी वाढ-

सायकल विक्री अचानक वाढली असली तरी सायकल निर्मिती करणारे कारखाने बंद आहेत. त्यामुळे बाजारात सायकलची आवक कमी झाली. त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सायकल विक्री होत आहेत. मात्र येणाऱ्या नवीन सायकल मात्र महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः चीन आणि जपान बनावटीच्या इंपोर्टेड सायकल काही प्रमाणात महाग होण्याची शक्यता आहे. भारतीय बनावटीच्या सायकलमध्ये लागणारे लोखंड आणि इतर साहित्य महागणार असल्याने या सायकल देखील 10 ते 15 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता सायकल व्यावसायिकांनी व्यक्त केली.

घरातील सर्व सदस्य वापरातील अशा सायकलची मागणी जास्त-

कोरोना टाळण्यासाठी आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल खरेदीचा कल वाढला आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी सायकल चालवावी असा आग्रह अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळेच सायकल विकत घेताना कुटुंबातील सर्व सदस्यांना ती वापरता येईल, याकडे खरेदारांचे लक्ष आहे. लहान मुलांच्या सायकलच्या किंमत साधारणतः 3 ते 7 हजार तर मोठ्या सायकलची किंमत 6 ते 10 हजारच्या घरात आहे. गियरच्या सायकलची किंमत 12 ते 20 हजार इतकी आहे. तर इंपोर्टेड सायकची किंमत या 75 हजार ते दीड लाखांपर्यंत असल्याची माहिती औरंगाबादच्या सायकल व्यावसायिकांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details