महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2020, 5:30 PM IST

ETV Bharat / city

पोलीस पाटील महिलेच्या आत्महत्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांचा आरोपीच्या घरावर हल्ला

दोन दिवसांपूर्वी गावातील पोलीस पाटील महिलेने काही लोकांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळाल्याने गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.

sillod
गावकऱ्यांचा आरोपीच्या घरावर हल्ला

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव येथे संतप्त जमावाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी गावातील पोलीस पाटील महिलेने काही लोकांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळाल्याने गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.

काय आहे प्रकरण

ग्रामपंचायतीचा शिपाई हा पोलीस पाटील महिलेला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता. याचा त्रास सहन न झाल्याने सदर महिला पोलीस पाटलाने 10 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने व्हिडिओ बनवत आपली व्यथा मांडली होती. या व्हिडिओत महिलेने त्रासाबद्दल सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी याकडे काणाडोळा केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही. महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. मात्र, त्यांना लगेच जामीन मिळाला. या प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल केले नसल्याचा आरोप करत, संतप्त गावकऱ्यांनी रात्री पोलिसांच्या दोन गाड्या फोडून जमाव आरोपींच्या घराची नासधूस करायला लागले. याचवेळी ग्रामस्थांनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या दंगल नियंत्रण पथकाला दमदाटी केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी यावेळी हवेत 4 फायर केले. याघटनेत एक अधिकारी तसेचं 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेत पोलिसांच्या दोन गाड्याचे नुकसान झाले असून, 55 गावकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची चौकशी होईल - पालकमंत्री

सिल्लोडच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सगळ्याच बाजूने चौकशी होईल, कोणालाही सोडले जाणार नाही. तसेच यात पोलीस दोषी असतील तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details