औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. सहा विधानसभा मतदारसंघांत शहरातील सर्वच मतदार संघात इम्तियाज जलील यांना चांगले मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही वेगळे चित्र राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पडसाद; औरंगाबाद लोकसभेचा निकाल विधानसभेत ठरणार प्रभावी - मतदान
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे या पराभवाचे परिणाम आता विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कन्नड आणि वैजापूर या दोन विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान मिळाले आहे. तर गंगापूर विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव यांना जास्त मतदान मिळाले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अनेकांचे गणित बिघडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभा मतदार संघात औरंगाबाद पूर्व मतदार संघात भाजपचा आमदार असून या मतदार संघात 36930 मतांची आघाडी जलील यांना मिळाली.
औरंगाबाद मध्यमध्ये 49123 मतांची आघाडी जलील यांना मिळाली. तर पश्चिम मतदार संघात जिथे शिवसेनेचे आमदार आहेत. तेथे अवघी 6035 इतके अधिकचे मताधिक्य खैरेंच्या पारड्यात पडले. तर ग्रामीण भागातील कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव पेक्षा 4614 इतके अधिकचे मताधिक्य घेऊ शकले. वैजापूर येथे खैरेंना हक्काची मत मिळाली. मात्र भाजपचा आमदार असलेल्या गंगापूर विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितची हवा आणि हर्षवर्धनच्या राजकारणाने रंगत वाढणार असल्याच्या शक्यतेने युती आणि आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले हे नक्की.