औरंगाबाद - पंधरा ते अठरा वयोगटामधील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात ( 15 to 18 years Childrens Vaccination ) झाली. औरंगाबाद शहरात सहा ठिकाणी लहान मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन शाळांचा तर चार आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी दोन शाळांमधील लसीकरण मर्यादित काळासाठी तर चार आरोग्य केंद्रावर अमर्यादित काळासाठी लहान मुलांचे लसीकरण केले जाईल ( Aurangabad vaccination centers ) अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
70 हजार मुलांचे शहरात उद्दिष्ठ -
लहान मुलांच्या लसीकरणासाठी विशेष तयारी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोहीम जाहीर केल्यानंतर, लहान मुलांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली होती. लहान मुलांना लस देताना त्यांच्या पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर मुलांना कुठलीही बाधा होणार नाही, याबाबत पालकांची जनजागृती करण्यात आली आणि त्यानंतर लसीकरण हे सुरू करण्यात आले. शहरांमध्ये जवळपास 70 हजार लहान मुलाची नोंदणी अपेक्षित आहे आणि ते उद्दिष्ट पुढील पंधरा दिवसात गाठण्याचा मानस असल्याचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली.