औरंगाबाद -कोरोनामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली. त्यात महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ऑनलाईन शिक्षण त्यांना घेता आले नाही. त्यामुळे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी महानगरपालिकेने शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबविला, यामुळे 70 टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले असल्याची माहिती प्रिदर्शनी महानगर पालिका शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केला आहे. शिक्षण आपल्या दारी उपक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
शिक्षण आपल्या दारी : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी 'मनपा'चा अनोखा उपक्रम पालिकेचे शिक्षक जातात विद्यार्थ्यांकडे
ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महानगर पालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांकडे जात आहेत. परिसरातील मोकळी जागा किंवा मंदिर येथे काहीवेळ शिक्षक विद्यार्थ्यांना भेटतात, शिक्षकांकडे असलेल्या मोबाईल आणि पुस्तकांद्वारे शिक्षक अभ्यास करवून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी पुन्हा एकदा लागत असल्याचे पालिकेच्या शिक्षकांनी सांगितले.
'वर्षभरात विद्यार्थी विसरले अभ्यास'
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता शाळा बंद करण्यात आल्या. जवळपास दोन महिने शाळा बंद राहिल्या, त्यानंतर खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र ही पद्धत महानगर पालिकेच्या शाळेत राबवणे शक्य नव्हते. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने मोबाईल इंटरनेट घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे वर्षभर जवळपास 70 ते 80 टक्के विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले. वर्षभर शिक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आधी केलेला अभ्यास ते विसरले. त्यांना आधीचे काहीच आठवत नसल्याचे जाणवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिल्यापासून शिक्षण द्यावे लागत असल्याचा अनुभव प्रियदर्शनी शाळेच्या शिक्षिका रश्मी होनमुटे यांनी सांगितला.
'शाळा आपल्या दारी'मुळे विद्यार्थी आनंदी
एक वर्ष शाळेपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना देखील शाळेची आठवण येत होती. मात्र कोरोनाच्या नियमांमुळे शाळेत जाणे शक्य झाले नाही. त्यात ऑनलाईन अभ्यास करणे शक्य नसल्याची खंत विद्यार्थ्यांना होती. महानगर पालिकेच्या वतीने राबवलेल्या उपक्रमामुळे शिक्षण घेणे सोपे झाले. अभ्यास करताना कळत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत असल्याने अभ्यास करण्याची गोडी वाढली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला. आता अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली असून शिक्षक चांगले शिकवत असल्याचा अनुभव प्रयदर्शनी शाळेचा विद्यार्थी शिवम चौधरी यांनी सांगितला.
हेही वाचा -VIDEO खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड