औरंंगाबाद - एक लाख रूपये परत मिळवण्यासाठी अकोल्याहून दोन महिलांनी दोन चिमुकल्यांना शहरात आणून भिक मागावयास लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जनाबाई (वय ६५) व सविता (वय ३५) रा. मुकुंदवाडी यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोन्हीही महिलांनी सात महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील राहूल पगारे, व शेख पाशा यांच्याकडून या मुलांना विकत आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
मुलांना विकत घेतल्याचा करार केलेला -
मुकुंदवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज नाथाजी वीर (वय ४७) यांनी या महिला दोन्ही मुलांना दोन दिवसांपासून मारहाण करताना पाहिले होते. याप्रकरणी वीर यांनी महिलांना हटकल्यानंतर त्यांनी या मुलांच्या पालकाकडून प्रत्येकी ५० हजार रूपये येणे बाकी असल्याने त्यांची मुले विकत आणली असल्याचे सांगितले. तसेच तसा बॉण्ड (करार) केल्याचे सांगितले.