औरंगाबाद : मैत्री दिन साजरा होत असताना जिल्ह्याच्या राजकारणात एका मित्राचे पद काढून दुसऱ्याला देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यात दो दोस्त अमाने-सामने, अशी स्थिती निर्माण झाली असून, दोघांचे लक्ष आहे मिशन महानगर पालिका. हे दोन मित्र दुसरे-तिसरे कोणी नसून, शिंदे गटातील बंडखोर आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आ. किशनचंद तनवाणी ( Former MLA Kishanchand Tanwani ) हे आहेत. त्यामुळे मैत्री दिनाला ( Shiv Sena Post of Metropolitan Chief ) या दोघांची चर्चा चांगलीच रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे.
किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती :शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी शिंदे समर्थक आमदार प्रदीप जैस्वाल नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बंडानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करून ते पद त्यांचे जुने जवळचे मित्र किशनचंद तनवाणी यांना देण्यात आले. शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील ही दुसरी हकालपट्टी आहे. या आधी आ. संजय शिरसाट यांचे समर्थक आणि युवासेनेचे पदाधिकारी असेलल्या राजेंद्र जंजाळ यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ही दुसरी कारवाई सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
निवडणुकीत मित्र झाले विरोधक :किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल दोघेही जुने मित्र आणि शिवसेना स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ते. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणतात आणि तसेच या दोन मित्रांमध्ये झाले. २०१४ सालच्या निवडणुकीत सेना-भाजपची युती तुटली. मध्य विधानसभा मतदारसंघात सेनेचे विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपने किशनचंद तनवाणी यांना सेनेतून वेगळे करीत उमेदवारी दिली. दोन मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. मतांचे विभाजन झाले आणि दोघेही पराभूत झाले. आणि एमआयएमचे नवखे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले.
तनवाणी होते पदाच्या प्रतीक्षेत :निवडणुकीत पराभूत झाल्यावर भाजपने त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र, सेनेच्या कार्यपद्धतीत राजकारणाचे बाळकडू घेतलेले तनवाणी तिथे रमले नाही. प्रदीप जैस्वाल यांनी तनवाणी यांना परत आणले. शिवसेनेत परत येत असताना त्यांना चांगले पद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, अंतर्गत विरोधामुळे मागील अडीच वर्षांपासून तनवाणी पदाच्या प्रतीक्षेत राहिले.
शिवसेनेने तनवाणी यांना केले महानगर प्रमुख : प्रदीप जैस्वाल यांच्या बंडानंतर तनवाणी सोबत जातील असे वाटत होते. मात्र, त्याच वेळी शिवसेनेने जैस्वाल यांची हकालपट्टी करीत त्या जागी किशनचंद तनवाणी यांना महानगर प्रमुख केले. तर इकडे शिंदे गटाने क्षणाचा विलंब न करता प्रदीप जैस्वाल यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली. आता एकच पक्षात असणाऱ्या दोन मित्रांवर एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे.