औरंगाबाद- दीड कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आल्याचे धमकावून तोतया आयकर अधिकाऱ्याने एका व्यावसायिकाला ६० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तोतया आयकर अधिकाऱ्यासह तिघांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. खुद्द बांधकाम व्यवसायिकानेच या खंडणीप्रकरणाचे स्टिंग आॅपरेशन करुन पोलिसांना व्हिडिओ दिले आहेत. याप्रकरणी गुरुवारी जवाहरनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. अरविंद जवळगेकर, संजय पारख आणि महेश चौधरी (तिघेही रा. बीड बायपास परिसर) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी चौधरी यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक सुशांत दत्तात्रय गिरी (३५, रा. घर क्र. ६३, शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) यांचे संजय पारख हे मित्र आहेत. ७ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पारख यांनी गिरींना संपर्क साधून तुम्ही दीड ते दोन कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आयकर विभागाला करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच ही तक्रार आयकरचे अधिकारी अरविंद जवळगेकर यांच्या टेबलवर करण्यात आली असून ते माझे जवळचे मित्र आहेत. तेव्हा तुम्हाला हे प्रकरण मिटवायचे असल्यास भेटायला बोलवा, असे सांगितले. त्यानुसार गिरी यांनी १० आॅगस्ट रोजी बीड बायपासवरील झाल्टा फाट्यावर असलेल्या हॉटेल बासू येथे भेट घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर पारख हे ठरलेल्या दिवशी गिरी यांना घेऊन भेटीच्या ठिकाणी दाखल झाले. तेव्हा जवळगेकर हे सुरुवातीपासूनच महेश चौधरी यांच्यासोबत तेथे बसलेले होते. तेथे पारख यांनी दोघांची ओळख करुन दिली.
पारख यांनी ओळख करुन देताना जवळगेकर हे आयकर अधिकारी, तर चौधरी हा त्यांचा स्वीय सहायक असल्याची थाप मारली होती. त्याचवेळी जवळगेकर यांनी गिरींना धमकावत तुमच्याविरुद्ध आयकर बुडविल्याची तक्रार आली आहे. जवळपास दीड ते दोन कोटींचा आयकर बुडविल्याचे त्यात म्हटल्याचे ही सांगितले. हे ऐकून गिरी यांना धक्का बसला. त्यांनी मुळात एवढ्या मोठ्या रकमेचे आपण कामच करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आयकर बुडविण्याचा संबंधच नसल्याचेही गिरी यांनी या तिघांना सांगितले.
६० लाखांची तडजोड ४० लाखांवर-