औरंगाबाद - मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष असेल, पण साहित्य निर्मितीचा अनुशेष नाही. शासन साहित्यिक चळवळीला नेहमीच सहकार्य करत आहे. यापुढेही केले जाईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या, लोकसंवाद फाउंडेशन आयोजित (41)व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शनिवारी (दि. 25)रोजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मसापच्या मागण्यांची आम्हाला आठवण आहे. सहा महिन्यांत नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाला जागा देऊ. तसेच, अन्य प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊ, तसेच कृती आराखडाही बनवू आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी दर सहा महिन्यांनी बैठक घेत राहू, असे आश्वासनही चव्हाण यांनी यावेळी दिले आहे.
'गोंदण' या स्मरणिकेचे प्रकाशन
यावेळी यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी कोरोनाच्या मोठ्या कालावधीनंतर चांगलीच गजबजलेली पाहायला मिळाली. सगळीकडे बऱ्याच दिवसांनी एका मोठ्या सार्वजनीक कार्यक्रमाचे आजोजन झाल्याचा आनंद पाहायला मिळत होता. संमेलनातील व्यासपीठांना संत जनाबाई व्यासपीठ आणि प्र. ई. सोनकांबळे यांची नावे देण्यात आली आहेत. दरम्यान, यातील मुख्य संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटन सोहळा पार पडला. मावळते संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी (41)व्या संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्याकडे सूत्रे सोपवली. साहित्य संमेलनाच्या 'गोंदण' या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी राधाबाई बिरादार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलीक अतकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रविकिरण सावंत, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. बळीराम धापसे, डॉ. हंसराज जाधव आदींची उपस्थिती होती.