औरंगाबाद -गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आवाज पुन्हा घुमला. औरंगाबाद सहावी ते आठवी वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहेत. याआधी 23 नोव्हेंबर रोजी नवी येथे बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु इतर वर्गांना परवानगी देण्यात आली नव्हती. प्राथमिक शाळा सुरू करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाने आदेश दिल्यानंतर आजपासून राज्यभर पाचवी ते आठवी शाळा सुरू झाल्या असल्या तरी औरंगाबाद मात्र सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मार्च 2020पासून बंद होत्या शाळा
देशभरात कोरोनाचा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून जाणवू लागला. संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व प्रथम महानगरपालिका हद्दीतील शाळा बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र 23 मार्चपासून सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोनासंसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर राज्य सरकारने दिवाळीनंतर शाळा आणि महाविद्यालय टप्प्याटप्प्याने उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आठवी ते बारावीचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले होते. मात्र औरंगाबादेत शहरात हे वर्ग चार जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पालकांच्या संमतीपत्रानंतर शाळा झाल्या सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 2218 शाळा आहेत. त्यात औरंगाबाद शहरात 288 शाळा आहेत. त्यामध्ये विद्यार्थी संख्या 3 लाख 38 हजार 753 तर सात हजार 623 शिक्षक आहेत. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरू करत शाळांना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देत असताना पालकांचे संमतीपत्र अनिवार्य करण्यात आले होते. शाळेत असणाऱ्या शिक्षकांची माहिती मुख्याध्यापकांना ऑनलाइनपद्धतीने शिक्षण विभागाला देणे बंधनकारक होते. विद्यार्थी शाळेत आले असताना त्यांचे स्वागत शाळेकडून करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारात रांगोळी आणि फलकावर सुस्वागतम लिहून विद्यार्थ्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शाळांना हे आहेत नियम
- - शाळांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
- - स्वच्छतेच्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करू नये.
- - शाळेत हँडवॉश सॅनिटायझर साबण आणि पाण्याची व्यवस्था असावी.
- - विद्यार्थी आणि शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी करावी.
- - बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शाळेत प्रवेश द्यावा.
- - सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरुना तपासणी बंधनकारक.
- - शाळेत आपत्कालीन गट स्वच्छता गट स्थापन करणे, असे नियम शाळांना देण्यात आले आहेत.
'शाळा सुरू झाल्यावर आनंद'
गेल्या आठ महिन्यांपासून सर्व शाळेत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. मात्र हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनंत अडचणी आल्या. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांचा निराकरण झाले नाही. मोबाइलवर शिकवणी सुरू असताना डोळ्यांना होणारा त्रास, नेटवर्क कमी असल्यास शिक्षकांचा आवाज विद्यार्थ्यांना न येणे, शिक्षक नेमके काय शिकवत आहेत, याबाबत संभ्रम असणे. अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना होत्या. मात्र आता शाळा सुरू झाल्यावर आनंद होत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. आपल्या जुन्या मित्रांना तब्बल वर्षभराने भेटल्यावर आनंद होत असून त्यांच्यासोबत वर्गात शिक्षण घेताना वेगळा अनुभव येत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.