औरंगाबाद - मित्रांचा वाढदिवस म्हणले की छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. असाच एक कार्यक्रम ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती येथील जिल्हापरिषदेच्या वतीने घेण्यात आला. मात्र, हा कार्यक्रम कोणत्या साहेबांच्या नव्हे, तर झाडांच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी झाडांना पोषक अशा सेंद्रिय खतांचा केकदेखील कापण्यात आला.
झाडांच्या वाढदिवसानिमित्त नदीकाठावर खास मंडप उभारण्यात आला. फुलांची आरास, रांगोळी व सुंदर सजावटही करण्यात आली. जणू एखाद्या नेत्यांचा किंवा पुढाऱ्याचा वाढदिवस असेल असे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमात आसपासचे लोकदेखील बोलाविण्यात आले होते. महिलांनी झाडांना औक्षण केले. झाडांचा वाढदिवस धूमधडाक्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात झाला. अशा पद्धतीने शाळांत वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संगोपन व संवर्धनही गरजेचे असल्याचा महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात आला. ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाडांचाच पहिला वाढदिवस साजरा करणारा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा झाला. वृक्षारोपण करणाऱ्या सर्वांना प्रेरणा मिळावी, यासाठी अनोखा सोहळा साजरा झाल्याचे मुख्याध्यापक महेश लबडे यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट संपेना; 24 तासात आढळले नवे 46,164 रुग्ण
झाडांसाठी कापला सेंद्रिय खतांचा केक...
वाढदिवस म्हणले, की नेहमी केक असतो. वाढदिवसाच्या कार्यक्रमात झाडांना खाता येईल, असा सेंद्रिय खतांचा केक झाडाजवळ कापण्यात आला. वाढदिवस हा झाडांचा असल्याने त्यांनाही आनंदाने खाता आला पाहिजे, असा सेंद्रिय खतांचा केक सहशिक्षक रवी केदारे यांनी बनविला. हा कार्यक्रमातील पाहुण्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरला. झाडांप्रती शिक्षकांमध्ये असलेली संवेदनशीलता व आत्मीयता यातून प्रतीत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. उपस्थितांना खाण्यासाठीदेखील वेगळा केक कापण्यात आला.