औरंगाबाद -लहानपणीच एखाद्या व्यक्तीत दडलेले गुण दिसून येतात तसाच काहीसा अनुभव येतोय तो चाणक्य दांडगे या चिमुकल्याकडे पाहून. अवघ्या दहाव्या वर्षात तबल्यावर याची बोटं अक्षरशः सराईत वादकासारखी खेळतात. इतकंच नाही तर त्यातील अनेक प्रकार तो अगदी सहज वाजवतो, ज्यामुळे ऐकणारा मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
वडिलांकडून मिळाला वारसा..
चाणक्य कमी वयातच तबला वादनाची कला अवगत करत आहे. त्याला हा वारसा मिळालाय त्याचे वडील शरदकुमार दांडगे यांच्याकडून. शरदकुमारही प्रसिद्ध तबला वादक आहेत. त्यांचा ओम पंचनाद वाद्य प्रकार चांगलाच गाजला असून या माध्यमातून भारतीय वाद्यांची ओळख तबल्याच्या माध्यमातून त्यांनी जगाला करवून दिली. शरदकुमार दांडगे यांनी जवळपास 25 वाद्य तबल्याच्या माध्यमातून वाजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तबला वादनाचे बाळकडू आणि कल्पकता घरातून मिळाली आहे. त्यातच चाणक्याने मोठ्या हुशारीने ते आत्मसात केले. यामध्ये काही वेळा वडिलांनी शिकवल्याने तर काही वेळा वडिलांचे वाहून चाणक्यने ही कला आत्मसात केली आहे.
चाणक्य वाजवतो तबल्यातून अनेक धून..
अवघ्या दहा वर्षाच्या चाणक्य मात्र एकाच वेळी दहा तबले मोठ्या उत्साहात वाजवण्याचे कसब त्याने आत्मसात केले आहे. वडील शरदकुमार दांडगे तबल्याच्या माध्यमातून 25 वेगवेगळे वाद्य सादर करतात. त्यांच्याप्रमाणे चाणक्य देखील आता वेगळे वाद्यांचे सादरीकरण तबल्यातून करण्याचा प्रयत्न करतोय, आता तो सात ते आठ वाद्यांचे प्रकार तबल्याच्या माध्यमातून सादर करत आहे.
रोजच्या सरावातून चाणक्य होतोय पारंगत..
चाणक्याचे हात वयाच्या पाचव्यावर्षी पहिल्यांदा तबल्यावर पडले. कुठलेही प्रशिक्षण न घेता त्यावेळच्या सैराट चित्रपटातील गाणे त्याने तबल्याच्या माध्यमातून वाजवले. त्यावेळी चाणक्य तबला वाजवू शकतो हे त्याचे वडील शरदकुमार दांडगे यांना कळलं. त्यानंतर सुरू झालं चाणक्याच्या तबला वादकाचे प्रशिक्षण. शालेय शिक्षण घेऊन रोज किमान एक तास सराव त्याने सुरू केला. चार वर्षात वडिलांकडे असलेली वेगळी कला त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यात लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेत त्याने तबल्यातून अनेक वाद्य वाजवण्याचा प्रयत्न सुरू केला. इतर मुलांप्रमाणे त्याला खेळण्याचा मोह होतो. मात्र रियाज केल्याशिवाय तो खेळायला जात नाही, अशी माहिती चाणक्यची आई सुवर्णा दांडगे आणि वडील शरदकुमार दांडगे यांनी दिली.