औरंगाबाद -राज्यात अनेक समस्या आ वासून असताना, एकही राजकीय पक्ष निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करू शकला नाही. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. हा मतदारांचा अवमान असल्याचे सांगत, राज्यात स्थिर सरकार स्थापन करा, या मागणीसाठी औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले.
राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी औरंगाबादमध्ये शिक्षक संघटनेने केले आंदोलन हेही वाचा... उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न - संजय राऊत
औरंगाबाद शहराच्या क्रांतिचौक भागात सर्वपक्षीय शिक्षक संघटनांनी गळ्यात सर्व पक्षाचे चिन्ह असलेले मफलर घालून निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला. राज्यात लवकरात-लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची मागणी यावेळी शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी केली.
हेही वाचा... #बालदिन विशेष : जगभरातील बच्चे कंपनीला भुरळ पाडणारे हॉलिवूड सिनेमे
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटता सुटेना, अशी स्थिती आहे. सध्या राज्यात अनेक समस्या आहेत. त्यासाठी सरकार अस्तित्वात असणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने राज्याच्या समस्या कोण सोडवणार? असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला. परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बेरोजगारी असल्याने तरुण वर्ग त्रस्त आहे. राज्यातील विकासाची गती मंदावण्याची भीती आहे. असे असताना सरकार स्थापन करण्यास कोणीही तयार नाही. राजकीय पक्षांच्या या राजकारणामुळे सर्व सामान्य मतदारांचा अवमान झाल्याची भावना आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी आपल्या गळ्यात राजकीय पक्षांचे चिन्ह असलेल्या मफलर सोबत, विविध समस्यांच्या पाट्या लावत, आंदोलन केले.