औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून रुग्णांनी छोट्या आजारांसाठी उपचार घेण्यास दवाखान्यांकडे पाठ फिरवल्याच समोर आलं आहे. सर्दी खोकला झाला किंवा अंगदुखीसारखे आजार झाले की दवाखान्यात जाणारे रुग्ण आजारावर घरगुती उपचार करत असल्याचा अनुभव जनरल प्रॅक्टिशनर डॉ. राजू लोखंडे यांनी सांगितला.
कोरोनामुळे खोळंबलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू, छोट्या आजारांसाठी रुग्ण मात्र घरीच घेतात उपचार - Aurangabad Ghati Hospital Surgery news
सरकारी असो की खाजगी दवाखान्यात हाडांवर आणि हृदयाच्या होणाऱ्या शस्त्रक्रिया रुग्णांनी लांबणीवर टाकल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यापासून राहिलेल्या शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रुग्ण रुग्णालयात येऊ लागले असल्याची माहिती एशियन रुग्णालयाचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी दिली. तर कोरोना काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारांचे रुग्ण संख्येत 80% टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
कोविड सुरू झाल्यापासून अनेक रुग्णांनी आपल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. ज्यामध्ये हृदय विकार, आणि हाडांच्या होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने उपचार घेण्यास नकार देणाऱ्या रुग्णांनी आता उपचारासाठी रुग्णालयात संपर्क केला असून पुन्हा शस्त्रक्रिया करून घेण्यास रुग्ण अपॉइंटमेंट घेत आहेत, अशी माहिती एशियन रुग्णालयाचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी दिली.
घाटी रुग्णालयात 80% टक्क्यांनी घटली होती रुग्णसंख्या...
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या मोठी असते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचे उपचार घाटी रुग्णालयात करण्यात होते. त्यामुळे इतर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची रुग्णसंख्या 75 ते 80% टक्क्यांनी घटली होती. त्यात मध्ये काही दिवस साथीच्या रोगामुळे काही रुग्ण उपचारांसाठी आले मात्र संख्या दरवर्षीच्या तुलनेत कमीच होती. मात्र, ऑगस्टपासून अनलॉक झाल्याने पुन्हा एकदा रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांकडे वळले आहेत. त्यात राहिलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांनी वेळ घेतली असून पुन्हा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज केली जात असून आता रुग्णसंख्या 60 टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.