महाराष्ट्र

maharashtra

कोरोनावर नियंत्रणासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट ही त्रिसुत्री वापरावी - देसाई

By

Published : Mar 19, 2021, 10:38 PM IST

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले आहेत.

सुभाष देसाई
सुभाष देसाई

औरंगाबाद -राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. तसेच जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.

अतिरिक्त खाटा वाढवण्याचे निर्देश

सुभाष देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन, वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर व सर्व रुग्णालयांमध्ये अतिरीक्त खाटांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणांव्दारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच घाटीतील गंभीर रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

कोरोना लसीकरण वाढवण्याच्या सूचना

मोठ्या प्रमाणात ट्रेसिंग आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवत असताना, कोरोना लसीकरण मोहीमही व्यापक प्रमाणात राबवावी. याबाबत आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी बैठकीत सांगितले. तसेच प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, अशा सूचना यावेळी देसाई यांनी केल्या. अतिरिक्त व्हेंटिलेटरची जिल्ह्यात उपलब्धता करून देण्यासाठी पाठपुरवा सुरू असून, लवकरच ते उपलब्ध होतीत असेही सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज

या बैठकीत बोलताना जिल्ह्यातील वाढीव कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली. शहरासह ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून, ग्रामीण रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून, जिल्ह्यात एकूण 115 कोविड केअर सेंटर असून, 11763 आयसोलेशन बेड, 2124 ऑक्सिजन बेड तर 532 आयसीयू बेड, तसेच 300 व्हेंटीलेटर असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. लसीकरणासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयात तर शहरात 33 ठिकाणी लसीकरणाची सोय केली असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details