औरंगाबाद- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस फेकू दिवस म्हणून साजरा करा, अशी मागणी मिलिंद नागसेन स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षात दिलेली सर्व आश्वासने ही फोल ठरली आहेत. त्यांनी दाखवलेला अच्छे दिनचा फुगा हा फुटलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी काळे फुगे फोडून मोदींचा निषेध केला.
विद्यार्थी संघटनांचे औरंगाबादेत आंदोलन औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मोदींनी दिलेले आश्वासन फुग्यांवर लिहून, ही आश्वासनं खोटी असल्याचा आरोप करत हे फुगे फोडण्यात आले. मोदींनी दिलेली सर्व आश्वासनं खोटी असल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनेने मोदींविरोधात घोषणाबाजी केली.
हेही वाचा -देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर; एकूण चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा...
2014 पासून भाजप केंद्रात सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, हे सांभाळत असताना त्यांनी ज्या काही घोषणा दिल्या, त्या सर्व फोल ठरत आहेत. त्यामध्ये अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, स्मार्ट सिटी, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होणार, प्रतिवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करणार, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, शेतीमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमाफी, सरकारी शाळांचा घटलेला स्तर, ठप्प असलेली जनधन मुद्रा योजना, स्वीस बँकेतील काळे धन परत आणण्याची घोषणा, ग्राम सडक योजना, स्वस्त दरात वीज देण्याची घोषणा, अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा अनेक घोषणा या फोल ठरल्या आहेत. देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवत उद्योगपतींना देश विकला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
सर्व बँका, रेल्वे, विमानसेवा, विमा कंपन्या बड्या उद्योजकांना विकण्याचा आणि खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. आरक्षण संपण्याचा देखील विचार केला जातोय. देशासाठी मोठा रोजगार उपलब्ध करण्याऐवजी नोकर भरती बंद केली जात आहे. इतकच नाही तर धार्मिक तेढ देखील निर्माण केला जात आहे, असे आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. मोदींच्या आश्वासनांचा फुगा फुटला असा आरोप करत आंदोलकांनी प्रत्येक घोषणेचा एक - एक कागद काळ्या फुग्यांवर लावून ते काळे फुगे फोडत सरकारचा निषेध केला. पंतप्रधान आपली आश्वासनं पूर्ण करत नसतील तर त्यांचा वाढदिवस फेकू दिवस म्हणून साजरा करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.