औरंगाबाद- एमपीएसीतील महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती बंद करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषमाबाजी केली. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर हे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
एमपीएससीच्या महापोर्टल ऑनलाईन परीक्षेचा निषेध; औरंगाबादेत विद्यार्थ्यांचे 'अर्धनग्न' आंदोलन - आंदोलन
अनेक विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतात. मात्र आता राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा महापोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. या पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध आहे.
ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या पोर्टलमागे राजकीय नेते मंडळी असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. इतर परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थीकडे अॅन्सर की असल्याने त्या विद्यार्थ्यास सोडविलेल्या प्रश्नातून मिळालेल्या गुणांची माहिती मिळते. मात्र ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांकडे कुठलीही माहिती नसते.
परीक्षेत पारदर्शकता यावी, यासाठी जिल्हा निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, यासाठी आज महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न होऊन मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभाग नोंदविला.