औरंगाबाद - राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत सभा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी शहरात सक्रीय झाले आहेत. मात्र बालेकिल्ल्यात मनसे मुसंडी मारत असल्याचा धसका शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे शहरात सध्या मनसे आणि शिवसनेत चांगलीच खडाजंगी (mns Shiv Sena Dispute ) उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनीही शहराकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
वीस वर्ष खासदार असूनही शहरात काय विकास केला, भाजपचा सेनेला सवाल -24 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड या भाजप नेत्यांनी रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रम घेतला. जिल्ह्यासाठी काही घोषणा नितीन गडकरी यांनी केल्या. त्यात चिकलठाणा - वाळूज पूल आणि औरंगाबाद - पुणे हा नवा मार्ग सुरु करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. तर डॉ. कराड यांनी व्यासपीठावर बसलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर थेट समोरच टीका करत वीस वर्ष खासदार असताना काय काम केले, (Bjp Criticize To Shiv Sena ) असा जाब विचारला. त्यामुळे सेनेच्या गडात भाजप वरचढ होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी नेत्यांचे दौरे वाढले, महापालिकेची जोरदार तयारी - महाविकास आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्यातील भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यात नेत्या सुप्रिया सुळे, राजेश टोपे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 24 एप्रिलला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली, तर 26 एप्रिल रोजी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे, धनंजय मुंडे या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर दोन कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळे महापालिकेत जास्त संख्या नसलेली राष्ट्रवादी जिल्ह्यात सक्रिय होऊ पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.