औरंगाबाद -आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पिता-पुत्राला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने पकडले. सिटीचौक पोलीस ठाणे हद्दीतील काचीवाडा भागात ही कारवाई करण्यात आली. नेमीचंद शांतीलाल कासलीवाल (वय ४८), आकाश नेमीचंद कासलीवाल (वय २२) अशा दोन्ही सट्टेबाज पिता-पुत्रांची नावे आहेत.
काचीवाडा भागातील रहिवासी नेमीचंद कासलीवाल व त्यांचा मुलगा आकाश कासलीवाल पिता-पुत्र आयपीए सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना मिळाली होती. आयुक्त डॉ.निखील गुप्ता, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, जमादार व्ही.आर.निकम, एम.आर.राठोड, व्ही.जे.आडे, एम.बी.विखनकर, ए.आर.खरात, व्ही.एस.पवार, दामिनी पथकाच्या पी.एम.सरससांडे, एस.एस.नांदेडकर, एस.जे.सय्यद आदींनी काचीवाडा येथे छापा टाकला. त्यावेळी नेमीचंद कासलीवाल आणि आकाश कासलीवाल हे दोघेही क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असताना सापडले.
आयपीएलच्या सामन्यावर सट्टेबाजी, पिता-पुत्र जेरबंद - औरंगाबाद पोलीस आयुक्त
काचीवाडा भागातील रहिवासी नेमीचंद कासलीवाल व त्यांचा मुलगा आकाश कासलीवाल पिता-पुत्र आयपीए सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावर पोलिसांनी एक रायटींग पॅड हस्तगत केले. त्यामध्ये सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तब्बल 166 जणांची नावे सापडली. या नावांसमोर विविध प्रकारचे आकडे लिहिले होते. पोलिसांनी कासलीवाल पिता-पुत्राच्या ताब्यातून आठ मोबाइल, एक कॅलक्युलेटर, एक पॉवरबँक, इंटरनेट कनेक्शनसाठी लागणारे राऊटर, मोबाइलचे सात चार्जर, एक इलेक्ट्रीक बोर्ड असा एकूण 80 हजार 400 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासादरम्यान, सोमवारी एका दिवसात दोन लाख 38 हजार 40 रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले. तर आतापर्यंत आयपीएलच्या सामन्यावर तब्बल 70 ते 80 लाख रुपयांची देवाण-घेवाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.