औरंगाबाद - भाजपमध्ये एकाधिकारशाही वाढत चालली आहे. त्यामुळेच जुने नेते पक्षाला सोडून जात असल्याचा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपला लगावला आहे. राष्ट्रवादी पक्षात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासारखे चांगले नेते आहेत. ते एकनाथ खडसेंना सांभाळून घेतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. एकनाथ खडसेंनी आज भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना खैरे बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीचे संकट असताना मुख्यमंत्री घरात बसून राहतात, अशी टीका भाजपचे नेते करत होते. त्यावर शिवेसना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरे टाळत होते. तर त्यांच्यावर घरात बसून राहतात, अशी टीका करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठे दौऱ्यावर आहेत का? ते जशी काळजी घेत आहेत तशीच काळजी उद्धव ठाकरेदेखील घेत होते. त्यामुळेच आतापर्यंत त्यांनी दौरे केले नव्हते. एका ठिकाणी राहून उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक जण गर्दी करत आहेत. हीच गर्दी टाळावी व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी दौरे न करण्याचे निर्णय घेतले होते, असे खैरे यांनी व्यक्त केले.
'एकाधिकारशाही वाढल्याने जुने नेते भाजपला सोडून जातात' - Chandrakant Khaire over NCP
भाजपमध्ये जुन्या माणसांना तोडण्याचे काम केले जात आहे. खडसेंनी भाजप सोडावी यासाठी एक चौकडी काम करत होती, असा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकथान खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते खैरे म्हणाले, की भाजपमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात होत आहेत. नवीन आमदारांना पक्षात घेण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जातात. मात्र, त्याच वेळी जुन्या माणसांना तोडण्याचे काम केले जात आहे. खडसेंनी भाजप सोडावी यासाठी एक चौकडी काम करत होती. खरेतर खडसे यांनी फडणवीस यांच्यापेक्षा जास्त भाजप वाढवलेली आहे. पक्षांमध्ये एकमेकांना सन्मान द्यायला हवा. रोज पक्षामध्ये हा नेता येणार आहे, तो नेता येणार आहे, अशी चर्चा भाजपकडून नेहमी घडवली जाते. मात्र आता कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही.
खडसेंच्या बाबतीत फडणवीसांनी जे केले त्याबाबतीत प्रसिद्धी माध्यमांवर आपण पाहिले आहे. मी वर बसलो म्हणून मी काही करेल, असे राजकारण बरोबर नाही. अशा गोष्टींमुळे आता भाजपवर कोणाचा विश्वास बसत नाही. भाजपमध्ये सध्या साम-दाम-दंड-भेद वापरला जात आहे. त्यामुळे राज्याचे नाही तर देशाचे राजकारण खराब होत असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.