औरंगाबाद -19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होत असताना कोणीही गर्दी करु नये किंवा जास्त जमाव जमवू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध व्यक्त केला. सर्वत्र गर्दी होत असताना महाराजांच्या जयंतीला गर्दीला निर्बंध का? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चातर्फे उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारने जरी निर्बंध घालून दिले असले तरी आम्ही जयंती जल्लोषात साजरी करणार, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.
रमेश केरे पाटील - समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा क्रांती चौकात राज्य सरकारविरोधात आंदोलन
शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लावताच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. औरंगाबादच्या क्रांती चौक भागात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. राज्य सरकार मुद्दाम अशा पद्धतीचे निर्बंध लावत असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे.
राजकीय मेळाव्यांना गर्दी, मग जयंतीला काय अडचण
कोरोनाच्या कालखंडानंतर सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यामध्ये हजारोंची गर्दी पाहायला मिळते. राज्यात मोठमोठे समारंभ घेतले जात आहेत. तिथे देखील गर्दी होते. अशा वेळी राज्य सरकारने शिवजयंतीला निर्बंध का घातले? असा प्रश्न मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाज दुखावला गेला आहे. सरकार सर्वत्र निर्बंध घालते तर त्याचे पालन सर्वत्र झालेच पाहिजे. मात्र राजकीय पक्षांना एक नियम आणि महाराजांच्या जयंतीला एक नियम असं चालणार नाही. कितीही निर्बंध घातले तरी 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करणार, सरकारला गुन्हे दाखल करायचे असले तर ते करू शकतात असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.