औरंगाबाद - राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू (Schools Reopen) करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. मात्र, या निर्णयानंतर शहरातील रुग्णसंख्या पाहता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर वर्ग मात्र सुरू करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे शाळा संघटना मात्र सर्व शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने, शाळा चालक आणि मनपा यात संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
माहिती देताना मनपा शिक्षण अधिकारी आणि मेसा संघटना अध्यक्ष - मनपा घेणार आठ दिवसांनी निर्णय -
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक निर्बंध मनपातर्फे लावण्यात आले आहेत. त्यामुळेच मनपा हद्दीतील शाळा अद्याप सुरू होणार नाहीत असे निर्देश मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. सोमवारपासून दहावी आणि बारावी हे वर्ग सुरू करण्यात येतील, मात्र इतर वर्ग सुरू करण्यासाठी आठ दिवसानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील परिस्थिती पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, मात्र शाळा सुरू करताना कोविड नियमांचं पालन करूनच शाळा सुरू केल्या जातील. दहावी, बारावीचे वर्ग सुरू करताना लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल, अशी माहिती मनपा शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली.
- शाळा संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम -
राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, औरंगाबाद मनपाने दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, हा निर्णय चुकीचा आहे. आधीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. लेखन-वाचन अनेक विद्यार्थी विसरले आहेत. त्यांचे नुकसान टाळा व यासाठी सर्व शाळा सुरू होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने आपला निर्णय बदलायला हवा. 27 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करा अन्यथा आम्ही शहरातील सर्व शाळा सुरू करू, असा इशारा इंग्रजी शाळा चालकांच्या मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिला.