औरंगाबाद -विदर्भ आणि मराठवाड्यातून मुंबई गाठणं आता जलद होणार आहे. कारण बहुचर्चित समृद्धी महामार्ग लवकरच पूर्णत्वास येणार आहे. मार्गाचे काम प्रगती पथावर असून त्यातील काही भाग 1 मे 2021 पर्यंत पूर्ण होईल आणि पुढील दोन वर्षात मार्ग पूर्णत्वास येईल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
बहुचर्चित समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असा असेल समृद्धी महामार्ग
नागपूर - मुंबई प्रवास तोही कारमध्ये म्हणजे अनेकांना नकोसा असतो. जवळपास 700 किलोमीटरचे अंतर असून ते कापण्यासाठी जवळपास 15 ते 16 तासांचा प्रवास करावा लागतो. राज्याची राजधानी आणि उपराजधानी रस्त्याने जोडलेली असली तरी व्यवसाय आणि औद्योगिक दृष्ट्या दुरावलेले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या निर्मितीची कल्पना समोर आली. 55 हजार कोटींचा निधी खर्च करून तयार होणारा महामार्ग पूर्ण झाल्यावर ताशी 150 किलोमीटर या वेगाने प्रवास करणे शक्य होणार असल्याने अवघ्या काही तासांमध्ये सुरक्षित रित्या नागपूर - मुंबई प्रवास करणे शक्य होणार आहे. महामार्गावर 7 ठिकाणी भुयारी मार्ग असतील, त्यात औरंगाबाद 1, नाशिक 1 आणि ठाणे 5 असे भुयारी मार्ग असणार आहेत. त्यामुळे वेगवान प्रवास शक्य होणार आहे.
हेही वाचा -22 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
औरंगाबादसह मराठवाड्याला होणार फायदा
मराठवाडा हा तसा दुष्काळी भाग, अनेकवेळा मागासलेला भाग म्हणून देखील ओळखला जातो. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातून 112.50 किलोमीटर तर जालना जिल्ह्यातून 42.50 किलोमीटर रस्ता असा एकूण 155 किलोमीटरचा रस्ता जाणार आहे. तर पळशी येथे डोंगराच्या मधून बोगदा तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. जालना जिल्ह्यात आजपर्यंत 45% टक्के तर औरंगाबाद जिल्ह्यात 54% काम पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील महत्वाचा हा टप्पा 1 मे 2021 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास आहे. नागपूर - शिर्डी दरम्यान सर्वात वेगवान काम अमरावती जिल्ह्यात होत असून आज पर्यंत जवळपास 75% टक्के काम पूर्ण झालं आहे. औरंगाबादजिल्हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते, त्याचबरोबर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे समृद्धी महामार्गामुळे पर्यटन आणि उद्योग यासाठी मोठा फायदा होणार आहे. हिजेवाडी प्रमाणे औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीला फायदा होईल. त्याचबरोबर शेतात काढलेला शेतीमाल अवघ्या काही तासात मुंबई पर्यंत पोहचवता येईल. शेतीमालाला बाजारपेठ निर्माण होईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने मराठवाड्यात समृद्धी घेऊन येईल असा विश्वास महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी व्यक्त केला.
वैजापूर तालुक्याला मिळणार वेगळी ओळख
समृद्धी महामार्ग निर्माण होत असून त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याला विशेष महत्व मिळणार आहे. सिडको प्रमाणे विकसित शहर वैजापूर जवळ तयार होणार आहे. त्याला महानगर किंवा कृषी विकास केंद्र म्हणता येईल. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती विकसित होईल. जिथे उद्योग, शेती व्यवसायाला चालना मिळेल. विदेशी विद्यापीठ देखील तिथे निर्माण होऊ शकत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने वेगाने अंतर कमी करण्याबरोबर विभागातील बेरोजगारी कमी करणारा प्रकल्प होणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्व निर्माण होणार असल्याच मत व्यक्त केलं जातं आहे.
हेही वाचा -शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस