महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

औरंगाबादेत रशियन स्टिल कंपनी ६,८०० कोटींची करणार गुंतवणूक - Mumbai Industrial Corridor

इलेक्ट्रिक स्टिल निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे.

मुख्यमंत्री आणि कंपनी संचालक मंडळ

By

Published : Jul 25, 2019, 9:11 PM IST

मुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात उद्योग उभारणीसाठी रशियन कंपनीला आवश्यक असणारे सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. रशियामधील सर्वात मोठी स्टिल कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

इलेक्ट्रिक स्टिल निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर) शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागा पाहिली असून ती देण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. २०२२ मध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होईल. त्यावेळी सुमारे ६ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

औरंगाबादच्या ‘ऑरिक’मध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) हा प्रकल्प होणार आहे. या कंपनीमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार असून अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे या कंपनीला शासनस्तरावर सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

भारतात मागील ३० वर्षांत वीजेची मागणी अंत्यत वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज ३० पटींनी वाढलेली आहे. वीज वहन व ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टिल एनएलएमके कंपनी तयार करते. एनएलएमके सध्या भारताला २० टक्के ट्रान्सफॉर्मर स्टिल पुरवत आहे. ही कंपनी महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत स्टिल उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे दिली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, ऑरिकचे सह व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील आणि रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह, ए. काव्होसीन, कार्यकारी संचालक एन. गुप्ता आणि प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह हे यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details