महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 29, 2022, 4:50 PM IST

Updated : Apr 29, 2022, 6:39 PM IST

ETV Bharat / city

वृद्धाला भाड्याच्या घरात सोडून नातेवाईक फरार; परिसरातील नागरिकांनी केला सांभाळ

एका आजारी वृद्धाला ज्याला जागेवरून हलता देखील येत नाही, त्यांना त्यांचे भाऊ आणि बहीण भाड्याच्या घरात सोडून निघून गेले. तब्बल महिनाभर वाट पाहिल्यावर परिसरातील नागरिकांनी त्या वृद्धाला आधार वृद्धाश्रमात भरती (Aadhar Vrudhashram Aurangabad) केले. राजेश भिकूचंद अग्रवाल वय अंदाजे 54 वर्ष असे त्या वृद्धाचे नाव आहे. मागील एक महिन्यांपासून ते जरीपुरा येथील पवार कुटुंबियांच्या घरात भाड्याने राहत होते.

Aadhar Vrudhashram
वृद्धाला आधार वृद्धाश्रमाने दिला आधार

औरंगाबाद - कलयुगात कोणी कोणाचे नसते हे नेहमी बोलले जाते, मात्र त्याचा प्रत्यय औरंगाबादच्या जरीपुरा भागात आला. एका आजारी वृद्धाला ज्याला जागेवरून हलता देखील येत नाही, त्यांना त्यांचे भाऊ आणि बहीण भाड्याच्या घरात सोडून निघून गेले. तब्बल महिनाभर वाट पाहिल्यावर परिसरातील नागरिकांनी त्या वृद्धाला आधार वृद्धाश्रमात (Aadhar Vrudhashram Aurangabad) भरती केले.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

वृद्धाला सोडून नातेवाईक फरार -राजेश भिकूचंद अग्रवाल वय अंदाजे 54 वर्ष असे त्या वृद्धाचे नाव आहे. मागील एक महिन्यांपासून ते जरीपुरा येथील पवार कुटुंबियांच्या घरात भाड्यानेे राहत होते. ते पोलियोग्रस्त असल्याने जागेवरून उठतासुद्धा येत नव्हते. त्यामुळे घरात स्वच्छता नव्हतीच. मात्र, त्यांचे प्रथविधी जागेवरच झाल्याने घरात घाण वास सुटला होता. नातेवाईक येत नसल्याने त्यांना आधार वृद्धाश्रमाचे गणेश डोणगावकर यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे राजेश अग्रवाल यांना वृद्धाश्रमात नेण्यात आले. आश्रमात अग्रवाल यांची पूर्ण काळजी घेऊन आरोग्य तपासणी करून उपचार दिले जातील, असा विश्वास आधार वृद्धाश्रमाचे गणेश डोणगावकर यांनी दिला.

भाऊ आणि बहिणीने सोडले वाऱ्यावर - राजेश अग्रवाल जुन्या शहरातील जाफर गेट भागात आपल्या भावासह राहत होते. काही महिन्यापूर्वी त्यांचा भाऊ त्यांना घेऊन जरीपुरा येथील पवार कुटुंबियांच्या घरी भाड्याने राहायला आले. एक दोन महिने त्यांचा भाऊ त्यांच्यासोबत राहिला. त्यावेळी बहीण येत जात होती. मात्र, महिनाभरानंतर भाऊ घरातून गेला तो परत आलाच नाही, तर बहिणीने देखील पाठ फिरवली. घर मालकाला ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी राजेश यांच्या भावाला आणि बहिणीला संपर्क केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर चुकीचा नंबर म्हणून फोन कट केला.

परिसरातील नागरिकांनी दिला आधार - घर मालक ज्योती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक महिन्यापासून राजेश अग्रवाल यांचा भाऊ परत आलाच नाही. आम्ही आणि परिसरातील नागरिकांनी त्या वृद्धाला जेवण दिले, काळजी घेतली, मात्र, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही. त्यांचे भाऊ आणि बहीण परत येतील अशी शक्यता नसल्याने शेवटी त्यांच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने आधार संस्थेला माहिती दिली आणि ते आजोबांना घेऊन गेले, असे ज्योती पवार यांनी सांगितले. तर राकेश अग्रवाल यांना आश्रमात नेत असताना त्यांची काळजी घेणाऱ्या महिलांच्या डोळ्यात पाणी आले होते. रक्ताच्या नात्यांनी तोडले तरी माणुसकी जपणाऱ्या नागरिकांनी वेगळे नाते जोडून अग्रवाल यांची काळजी घेतली.

हेही वाचा -Raj Thackeray : राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, विविध ठिकाणी जंगी स्वागत

Last Updated : Apr 29, 2022, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details