औरंगाबाद - छोट्याशा गावातून शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात येऊन हॉटेलमध्ये बारबालांसोबत काम करून आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या तरूणाने एक कादंबरी लिहिली आहे. बारबालांचे जीवन किती संघर्षमय असते, त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय अत्याचार होतात. त्यांच्यासोबत ग्राहक कशाप्रकारे व्यवहार करतात, त्यांचा प्रवास कुठून सुरू होते आणि कुठे संपतो. या बारबाल्यांच्या यातनेचा, संघर्षमय जीवनाचा जीवनपट 'टिश्यू पेपर' या कादंबरीत मांडला आहे. 'टिश्यू पेपर' या कादंबरीच्या लेखकाचे नाव आहे रमेश रावळकर.
बारबालांचा 'टिश्यू पेपर'मधून मांडला संघर्षपट असा होता लेखकाचा प्रवास -
रमेश रावळकर हे मूळचे जाफ्राबाद तालुक्यातील पिंपळगाव कडचे आहेत. त्यांच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही आणि गावाकडे शिक्षणाची सोयही नव्हती. मात्र, रावळकर यांच्यात शिक्षण घेण्याची प्रचंड जिद्द होती. त्यामुळे त्यांनी सोळाव्या वर्षी १९९५ मध्ये आपले घर सोडले आणि ते शिक्षणासाठी औरंगाबादेत दाखल झाले. मेहरसिंग नाईक कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतले. यानंतर बीए वसंतराव नाईक एम.ए. विवेकानंद महाविद्यालयात पूर्ण केले. डॉ. दादा गोरे यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. पूर्ण केली.
काम करून शिक्षण घेत केले वास्तव चित्रण -
रावळकर यांना हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना बार-हॉटेलवर वेटरचे काम करावे लागले. हे काम करताना साहित्य वाचनाची गोडी लागली. दोन कवितासंग्रहही त्यांनी लिहिले. यावेळी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. बारबाला, वेटरच्या जीवनाचे वास्तव चित्रण रमेश रावळकर यांचे 'माती वेणा' 'गावकळा' हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लोकसाहित्यावर 'करंडा' हा संपादित केलेला ग्रंथ आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'टिश्यू पेपर' या कादंबरीत शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका युवकाचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. हा युवक बारमध्ये वेटरचे काम करतो. त्या ठिकाणी कामाला असलेले इतर वेटर, बारबाला हेल्पर, मोरीवाली बाई, वस्ताद, कॅप्टन आदींच्या जीवनावर प्रकाशझोत या कादंबरीत टाकला आहे. बारबालांची तस्करी कशी केली जाते. याचे वास्तवही यातून मांडले आहे.
लेखकांना सरकारने मदतीसह प्रोत्साहन द्यावे -
रमेश रावळकर आता सध्या एका विनाअनुदानित महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करतात. मात्र या महाविद्यालयाला अनुदान मिळाले नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमच्यासारख्या लेखकांना, प्राध्यापकांना न्याय देऊन मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा -कोविड मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला उशीर; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे