औरंगाबाद -शहराच्या नामांतराचा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. संभाजी महाराजांच्या नावाने शहराला ओळख मिळावी, या मागणीवरून शिवसेना गेल्या 32 वर्षांपासून राजकारण करत असताना आता या नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि मनसे आक्रमक झाली आहे. 26 जानेवारीच्या आत शहराचे नाव बदला, या मागणीसाठी मनसेने राज्यभर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
बसच्या फलकावर संभाजीनगरचे स्टिकर
राज्यातील नाशिक बस स्थानकावर मनसेने औरंगाबादला येणाऱ्या बसच्या फलकावर संभाजीनगरचे स्टिकर लावले. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणीदेखील मनसेने आंदोलनाला सुरुवात केली आहे. औरंगाबादेत आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच रेल्वे स्थानकावर असणाऱ्या शहराच्या नावाच्या फलकांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला. स्थानकाच्या दोनही बाजूना स्थानकावर येणारे मार्ग बंद करण्यात आले असून प्रत्येक फलकासमोर रेल्वे पोलीस आणि राज्य पोलीसच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून उपाय योजना केल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
औरंगाबादेत लावण्यात आले होते फलक
औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळेस संभाजीनगरचे फलक शहरात विविध ठिकाणी लावले होते. त्यानंतर आता मनसेतर्फे राज्य सरकारला 26 जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्याला विशेष भेट राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली. शहराचे नाव संभाजीनगर करा अन्यथा गाठ मनसेशी आहे, अशा आशयाचे हे फलक लावण्यात आले होते. आता शहरात काऊंटडाऊन फलक शहरात लावण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दाशरथे यांनी दिली.
बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त नाही
मनसेच्या आंदोलनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. स्थानकावरील फलकांसमोर पोलीस कर्मचारी तैनात असले, तरी इतर ठिकाणी मात्र अद्याप पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला नाही. नाशिक, पालघर सारख्या ठिकाणी बस स्थाकांवर उभ्या असलेल्या बसच्या पाट्यांवर औरंगाबादच्या जागेवर संभाजीनागरचे स्टिकर लावण्यात आले. औरंगाबादच्या बस स्थाकांवर आणि विमान तळावर अद्याप पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला नाही. मात्र भविष्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले तर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.