औरंगाबाद -पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना सांगितले.
हेही वाचा -औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधला संवाद.. लसीकरणाबाबतची दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, इतर राज्याचे मुख्यमंत्री, तसेच विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.
जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवल्याची माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. ‘मन मे है विश्वास’ हा कोरोना विरुद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. तसेच, आर्मीचा देखील सहभाग होता. हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या 25 गावांना विशेष निधी देणार आहोत. शहरी तसेच, ग्रामीण भागासाठी ‘मेरा वॉर्ड सौ प्रतिशत टीकाकरण वॉर्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.
हेही वाचा -औरंगाबादमध्ये कुलस्वामिनी प्रतिष्ठाणचा 1001 दिवे लावून दीपोत्सव साजरा